बिबट्याच्या जबड्यातून मुलीला वाचविले

By Admin | Updated: June 9, 2014 00:04 IST2014-06-08T23:52:19+5:302014-06-09T00:04:33+5:30

अकोले : रुंभोडी-इंदोरी शिवारात बिबट्याने उच्छाद मांडला असून रुंभोडीतील दत्तवाडी परिसरात अंधारात दडून बसलेल्या बिबट्याने सातवर्षीय बालिकेवर हल्ला केला.

The girl is saved from the jaw jaw | बिबट्याच्या जबड्यातून मुलीला वाचविले

बिबट्याच्या जबड्यातून मुलीला वाचविले

अकोले : रुंभोडी-इंदोरी शिवारात बिबट्याने उच्छाद मांडला असून रुंभोडीतील दत्तवाडी परिसरात अंधारात दडून बसलेल्या बिबट्याने सातवर्षीय बालिकेवर हल्ला केला. प्रसंगावधान राखत मुलीच्या पित्याने बिबट्याच्या जबड्यातून बालिकेस ओढले, म्हणून मोठा अनर्थ टळला.
अमोल निवृत्ती वाकचौरे हे आपल्या मुलीला घेवून रस्त्याने जात असताना उसाच्या कडेला अंधारात दडून बसलेल्या बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला. बिबट्या मुलीला ओढतोय हे पाहून वाकचौरे यांनी तिला घट्ट पकडत जिवाच्या आकांताने प्रतिहल्ला करत आरडाओरडा केला.
जवळच असलेल्या लोकांनी रस्त्याकडे धाव घेतली. त्याचवेळी समोरुन टेम्पो व दोन मोटरसायकल आल्याने रस्त्यावर उजेड झाला. त्यामुळे बिबट्याने मुलीला सोडून देत जवळच्या उसाच्या शेतात पोबारा केला. मुलीच्या पाठीला व पायाला बिबट्याच्या पंज्याच्या फटक्यामुळे खोल जखम झाली आहे. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला वाचविण्यासाठी पित्याने दाखविलेल्या धाडसाचे तालुक्यात कौतुक होत आहे़ वन खात्याने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी करताच चार ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे़ पिंजऱ्यालाही बिबट्या हूलकावणी देत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आठवड्यातील दुसरी घटना
दरम्यान रविवारी तातडीने दत्तवाडी शिवारात पिंजरा लावण्यात आला आहे. दोन दिवासांपूर्वी इंदोरीतील कांदेवाडी भागात बिबट्याने घरासमोरील अंगणात झोपलेले शेतकरी बबन नवले व शेतमजूर सीताराम पथवे यांच्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार झाल्याने ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली आहेत.
बिबट्या मांजर कुळातील भित्रा प्राणी आहे. स्वत:हून तो हल्ला करत नाही. भक्ष्याच्या शोधार्थ मे, जूनमध्ये बिबट्या उसाच्या रानात जास्त आढळतो. शेतकऱ्यांनी शेळ्या बंदिस्त जागी बांधाव्यात. उघड्यावर, अंगणात झोपू नये. आपणच आपली काळजी घ्यावी. बिबट्या जेरबंद करण्यासाठी चार पिंजरे रुंभोडी- इंदोरी शिवारात लावले आहेत.
-आर. के. सगभोर,
वन परीक्षेत्रपाल

Web Title: The girl is saved from the jaw jaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.