मुलींच्या उपस्थिती भत्त्यासाठी 30 लाख
By Admin | Updated: July 22, 2014 00:05 IST2014-07-21T23:12:00+5:302014-07-22T00:05:56+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील दुर्बल घटकातील पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलींना उपस्थिती भत्त्यापोटी ३० रुपये देण्यात येणार आहेत.

मुलींच्या उपस्थिती भत्त्यासाठी 30 लाख
अहमदनगर : जिल्ह्यातील दुर्बल घटकातील पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलींना उपस्थिती भत्त्यापोटी ३० रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ज्या शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे, त्या शाळा दररोज तासभर आधी सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर भर देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात दुर्बल घटकात मोडणाऱ्या कुटुंबातील मुलींना प्रतीदिन एक रुपये प्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी २९ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. सदस्य परतब नाईकवाडी यांनी जिल्ह्यात ज्या प्राथमिक शाळांचा दर्जा ढासाळलेला आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी दररोज अतिरिक्त तास भर अध्यापन करण्याची मागणी केली. त्यानुसार शाळा दररोज तास भर आधी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आर्थिक वर्षात दप्तर खरेदीसाठी ९ लाख ७० रुपयांची ई-निविदा काढण्याचा, शाळा व्यवस्थापन समितीने साडेचार कोटींचे गणवेश तातडीने खरेदी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, एबीएल कृतीयुक्त अध्ययन पध्दतीनेच सॉफ्टवेअर खरेदी १ कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी देण्यात आली. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रश्नावली तयार करून त्यात शंभर टक्के शिक्षकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त दोन गुण देण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
स्काऊट गाईड योजनेचा जिल्हा मेळावा व प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५ लाख ३० हजारांच्या योजनेला मान्यता देण्यात आली. जिल्हास्तर शालेय महिला व ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या स्पर्धास शुल्क आहेत. सभेला सदस्या डॉ. प्रतिभा पाचपुते, परतब नाईकवाडी, सुरेखा राजेभोसले, मिनाक्षी थोरात, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सुंनदा ठुबे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आठ दिवसात शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया
आठ दिवसात शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकरी गोविंद यांनी दिली. एक आॅगस्टपासून शिक्षकांना ओळखपत्र देण्यात येणार असून शाळांमध्ये हे ओळखपत्र न वापरणाऱ्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.