पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवलेंचा मृत्यू- पत्नीचा कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:55 IST2018-04-17T15:47:28+5:302018-04-17T15:55:31+5:30
कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवलेंचा मृत्यू- पत्नीचा कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडनंतर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील आरोपी नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. गिरवले यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असून, पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान गिरवले यांच्या मृत्यूनंतर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलीस मारहाणीत गिरवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून गुन्हा दाखल होईपर्यत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली होती. मात्र, आता सीआयडीकडे तपास सोपविणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर गिरवले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी त्यांच्या नातेवाईकांनी दर्शविली आहे. कैलास गिरवले यांचे शव घेऊन रुग्णवाहिका नगरमध्ये दाखल झाली आहे. गिरवले यांच्या घरासमोर मोठा जमाव जमला असून, फुलांनी सजविलेली शववाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता अमरधाम येथे गिरवले यांचा अंत्यविधी होणार आहे.