घोटी-शेवगाव राज्यमार्गाचे होणार रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:16+5:302021-02-06T04:37:16+5:30

शिवाजी पवार लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातून जाणा‌-या घोटी ते शेवगाव या राज्यमार्गाच्या कामाला नुकतीच तांत्रिक मान्यता ...

Ghoti-Shevgaon state highway to be widened | घोटी-शेवगाव राज्यमार्गाचे होणार रुंदीकरण

घोटी-शेवगाव राज्यमार्गाचे होणार रुंदीकरण

शिवाजी पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातून जाणा‌-या घोटी ते शेवगाव या राज्यमार्गाच्या कामाला नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली आहे. महिनाअखेरपर्यंत कामाची निविदा प्रसिद्ध होणार असून साडे पाच मीटर राज्यमार्गाचे दहा मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. वर्षभरात काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे.

बाभळेश्वर फाटा ते श्रीरामपूर, श्रीरामपूर ते टाकळीभान व टाकळीभान ते नेवासे फाटा या तीन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यातील कामाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. दुस-या टप्प्यातील कामाची तांत्रिक मंजुरी येत्या सोमवारी मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टाकळीभान ते नेवासे फाटा हे काम मात्र नेवासे उपविभागाच्या अंतर्गत येते. राहाता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यातून जाणारा हा राज्यमार्ग ५३ किलोमीटर अंतराचा आहे. त्यातही श्रीरामपूर हे प्रथमच मोठ्या राज्यमार्गाच्या नकाशावर येणार असून ते इतर शहरांशी जोडले जाणार आहे. सध्याच्या बाभळेश्वर ते श्रीरामपूर व श्रीरामपूर ते नेवासे मार्गाची मोठी दुरवस्था झालेली आहे. एकाच वेळी दोन मोठी वाहने त्यावर प्रवास करू शकत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे अवघ्या साडे पाच मीटर रुंदीच्या या राज्यमार्गाचे दहा मीटरपर्यंत रूंदीकरण केले जाईल. त्याकरिता १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

------------

पुलांचे होणार रुंदीकरण

राहाता तालुक्यातील एक तसेच श्रीरामपूर तालुक्यातील पाच ते सात पुलांचे रूंदीकरण केले जाणार असल्याचे अभियंता आर.आर.पाटील यांनी सांगितले. त्यामुळे अवजड वाहतुकीचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.

----------

नगरपालिका हद्द वगळणार

श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतून जाणार्या संगमनेर नेवासे रस्त्याचे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाणार नाही. पालिकेची हद्द वगळूनच उर्वरित काम पूर्ण करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

----------

घोटी, राजूर, अकोले व संगमनरमार्गे जाणारा हा राज्यमार्ग आहे. मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल.

-आर.आर.पाटील,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर.

---------

Web Title: Ghoti-Shevgaon state highway to be widened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.