विकास मंडळाचे गौडबंगाल झाकण्यासाठी घंटानादचे नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:33+5:302020-12-22T04:20:33+5:30
अहमदनगर : नगर शहरातील लाल टाकी परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेवर प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वास्तू उभारण्याऐवजी ही जागा बिल्डरांच्या ...

विकास मंडळाचे गौडबंगाल झाकण्यासाठी घंटानादचे नाटक
अहमदनगर : नगर शहरातील लाल टाकी परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेवर प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वास्तू उभारण्याऐवजी ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आखणाऱ्यांनी आधी टेंडरचा सर्व व्यवहार शिक्षकांपुढे मांडावा आणि मगच घंटानाद आंदोलन करावे. विकास मंडळात केलेल्या गौडबंगालाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी विरोधक घंटानादाचे नाटक करीत आहेत. सासवड अधिवेशनाचा हिशेब देण्याऐवजी संघटना बदलणारांनी असली नाटके करू नयेत. सभासद त्यांना चांगले ओळखून आहेत, अशी टीका गुरुमाऊली मंडळाचे सरचिटणीस विठ्ठल फुंदे यांनी केली.
विकास मंडळासाठी सभासदांकडून पैसे घेताना फक्त आपल्या जवळच्या लोकांकडूनच पैसे घेण्यात आले. बांधकामाचे टेंडर कुणाला आणि कसे दिले हे विश्वस्तांपैकी अध्यक्ष सोडून इतरांना माहीत आहे का? अनेक विश्वस्तांनी विकास मंडळासाठी कोणी किती निधी दिला ते जाहीर करावे. टेंडर प्रक्रिया कशी राबविली, कोणाला टेंडर दिले याचा खुलासा करावा अन्यथा विकास मंडळाच्या विरुद्ध गुरुमाऊली मंडळसुद्धा आंदोलन करेल, असा इशारा उत्तर विभागप्रमुख राजू साळवे यांनी दिला.
विकास मंडळासाठी ज्या सभासदांनी पैसे दिले आहेत, ते परत मागत आहेत. हे पैसे देताना शिक्षक बँकेचे भांडवल कमी करण्याचा नाकर्तेपणा तत्कालीन अध्यक्षांनी केला आहे. नियमबाह्यपणे कोणताही करार न करता या रकमा विकास मंडळाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. बँकेने जर या रकमेची वसुली केली तर सभासद अडचणीत येतील. विकास मंडळासाठी दिलेले पैसे परत मिळतील, अशी सभासदांना खात्री नाही. विकास मंडळाच्या इमारतीची जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव या मंडळींचा आहे, अशी टीका फुंदे यांनी केली.
..............
बँकेचा कारभार काटेकोर
शिक्षक बँकेच्या घड्याळाचा व्यवहार अत्यंत पारदर्शी आहे. ऑनलाइन किमती उपलब्ध आहेत. कंपनीचा करार सर्वांसाठी उपलब्ध आहे. नव्वद टक्के सभासदांनी घड्याळे नेलेली आहेत आणि त्याबद्दल सर्वांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत, असे असताना बँकेला बदनाम करण्यासाठी काहीजण घंटानाद करीत आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने अतिशय चोख आणि काटेकोर कारभार केला आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यापूर्वी कधी मिळाला नाही इतका व्याजदर संचालक मंडळाने कायम ठेवींना दिला आहे, असेही फुंदे व साळवे यांनी म्हटले आहे.