मिळते चमचमीत खाणे; तिथे कोरोनाला का घाबरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:03+5:302021-05-17T04:19:03+5:30
कोतूळ : येथील लोकसहभागातून सुरू झालेले कोविड उपचार केंद्र सध्या इथल्या चमचमीत मेजवानीने प्रसिद्ध झाले. इथे प्रवेश मिळण्यासाठी आदिवासी ...

मिळते चमचमीत खाणे; तिथे कोरोनाला का घाबरणे
कोतूळ : येथील लोकसहभागातून सुरू झालेले कोविड उपचार केंद्र सध्या इथल्या चमचमीत मेजवानीने प्रसिद्ध झाले. इथे प्रवेश मिळण्यासाठी आदिवासी भागातील रुग्ण खासगी दवाखान्यापेक्षा अग्रक्रम देतात.
कोतूळ येथील हायस्कूलमध्ये एक महिन्यापूर्वी लोकवर्गणी व काही दानशूरांच्या मदतीने पन्नास बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू झाले. पहिल्या आठ दिवसांतच इथे दररोज सकाळी नाश्ता, चहा, दुपारी बाराला जेवण, सायंकाळी चहा, जेवण, दोनदा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी, वेळेत औषधे यामुळे आजपर्यंत इथून दीडशेहून जास्त रुग्ण बरे होऊन गेले. सध्या इथे ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे इथला एकही रुग्ण आजपर्यंत बाहेर पाठवावा लागला नाही.
कोतूळ आणि परिसरातील अनेकांनी सढळ हाताने मदत करून हे केंद्र सुरू केले. आज क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण इथे आहेत. कोतूळ परिसरातील आदिवासी भागातील तळे, विहीर, शिंदे, केळी कोतूळ, केळी ओतूर, पांगरी, सातेवाडी, मोरवाडी, फोपसंडी, अंभोळ, पैठण, मोग्रस, नाचणठाव, लहित, वाघापूर, पिंपळगाव खांड, धामणगावपाट या गावांतील रुग्णांना इथे उपचार मिळाले. महिन्यात दोनशेपैकी दीडशे रुग्ण बरे होऊन घरी गेले.
कोरोनाच्या आजारात तोंडाला चव नसते म्हणून रुग्ण पोटभर खात नाही. परिणामी ते लवकर बरे होत नाहीत असे लक्षात आल्याने इथे दररोज चमचमीत शाकाहारी, तर आठवड्यात एकदा मांसाहारी जेवण, शिवाय दररोज दोन अंडी असा चौरस आहार दिला जातो. कोतूळ ग्रामपंचायत सदस्य हेमंत देशमुख, भागवत खोल्लम, संतोष नेवासकर, योगेश निवृत्ती देशमुख, आदी तरुण दररोज सेवेत असतात.
.........
असा असताे मेनू
सकाळी नाश्ता : पोहे, सांजा, गोडशिरा, इडली-सांबर
दिवसातून दोनदा चहा, चार लिटर बाटलीबंद पाणी
जेवणात सकाळी चार पोळ्या, भात, भाजी, चटणी, फळे, तर दोन अंडी.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी तपासणी व औषधे
............
कोतूळ येथे लोकसहभागातील कोविड सेंटरमध्ये ५० बेड गावकऱ्यांनी केले. आम्ही दिवसातून तीनदा तपासणी करतो. कोतुळात अत्यंत सकस व चमचमीत ताजे जेवण व औषधोपचार मिळत असल्याने रुग्ण इथेच उपचारासाठी मागणी करतात. एकही रुग्ण बाहेर पाठवावा लागला नाही.
- डाॅ. अर्चना बांबळे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतूळ,
..........
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून गावातील सर्व तरुण व दानशूरांच्या मदतीने आम्ही चांगली सेवा देतो. लोकही भरभरून मदत करतात. अगोदर भीतीने ग्रासलेले रुग्ण एक-दोन दिवसांत मानसिक दबावातून मुक्त होतात. बरे होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला प्रेरणा देतो.
- योगेश रमेश देशमुख, समन्वयक.
160521\img-20210515-wa0152.jpg
कोतूळ लोकसहभाग कोवीड सेंटरमधील जेवणाचे फोटो