संगमनेर तालुक्यात टोळी जेरबंद
By Admin | Updated: June 28, 2017 18:41 IST2017-06-28T18:41:32+5:302017-06-28T18:41:32+5:30
या टोळीकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या बारा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.

संगमनेर तालुक्यात टोळी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : कनोली रस्त्यावरील (ता. संगमनेर) कणकापूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात आली. या टोळीकडून सुमारे तीन लाख रुपयांच्या बारा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व पोलीस सोमवारी रात्री गस्तीवर असताना ओझर बुद्रुक - कनोली रस्त्यावरील कनकापूर शिवारातील मारुती मंदिरालगत राहणारे रवी पंचवीड यांच्या वस्तीजवळील शेतात पहाटे पावणे तीनच्या सुमारास काही संशयित हालचाली दिसल्याने चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना जीपच्या उजेडात पाच ते सहा दरोडेखोर दबा धरून बसल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग करीत गणेश बबन सूर्यवंशी (वय ३०, रा. हनुमंतगाव ता. राहाता), मारुती सोमनाथ पवार (वय २०), अशोक इंद्रभान माळी (वय २०), सागर शिवदास माळी (वय १९, सर्व राहणार ओझर बुद्रुक, ता. संगमनेर ) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील मोटरसायकल (क्रमांक एम.एच.१७.झेड.३९०३), कोयता, चाकू, नायलॉन दोरी व मिरची पूड यासह ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पोलिसांना हुलकावणी देऊन पळालेल्या संतू ऊर्फ उंबऱ्या माळी (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) व सोमनाथ श्रीरंग बर्डे (रा. ओझर बुद्रुक, ता. संगमनेर) या दोघांचा तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील तसेच जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.