अठरा वर्षांपुढील लसीकरणाचाही फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:34+5:302021-05-04T04:10:34+5:30
अहमदनगर : पंचेचाळीस वर्षांपुढील नागरिकांनाच वेळेत लस मिळत नसताना आता अठरा वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे शासनाने जाहीर केले, मात्र ...

अठरा वर्षांपुढील लसीकरणाचाही फज्जा
अहमदनगर : पंचेचाळीस वर्षांपुढील नागरिकांनाच वेळेत लस मिळत नसताना आता अठरा वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे शासनाने जाहीर केले, मात्र त्याच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे. लस उपलब्ध नसल्याने पोर्टलवर नोंदणी होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय नगर शहरातील काही केंद्र वगळता जिल्ह्यात अद्याप १८ वर्षांपुढील लसीकरण सुरू झालेले नाही.
केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली. राज्य सरकारने ही लस मोफत देण्याचे मान्य केले. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. मात्र या पोर्टलवर नोंदणी होत नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे.
पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी मागितला जातो. तो टाकल्यानंतर पुढे ओळखपत्राचा नमुना, वय आदी माहिती भरली जाते. मात्र यापुढे लसीकरण कोठे आणि केव्हा करायचे अशी माहिती भरण्यात अडचणी येत आहेत. दिलेले केंद्र पंचेचाळीस वर्षांपुढील नागरिकांना असून ते सर्व बुक असल्याचे दर्शवले जाते. अठरा वर्षांपुढील लसीकरणासाठी नगर शहरातील केवळ दोन-तीन केंद्र आहेत. मात्र तेही बुक असल्याने तेथे नोंदणी होत नाही. अशा अडचणी येत असल्याने काही नागरिक थेट केंद्रावर जात आहेत.
दुसरीकडे ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणीची आवश्यकता नसून त्यांनी केवळ आधारकार्ड घेऊन केंद्रावर लस घेण्यासाठी जायचे आहे, मात्र केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने या नागरिकांचा हिरमोड होत आहे. अनेक केंद्रांवर मोठी गर्दी होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार होत आहेत.
एकूणच आवश्यकतेप्रमाणे लसीचा पुरवठा होत नसल्याने गोंधळ उडतो आहे.
---------------
अनेक केंद्र बंद
शुक्रवारी १० हजार डोस मिळाले होते. मात्र ते रविवारपर्यंत संपले. त्यामुळे सोमवारी अनेक केंद्र बंद होते. पुढील लस उपलब्ध झाल्यानंतरच ते केंद्र सुरू होतील.
-------------
मनपाच्या केंद्रांवरही गोंधळ
राज्य शासनाने अठरा वर्षांपुढील लोकांसाठी १० हजार डोसचा पुरवठा नगर जिल्ह्यासाठी केला आहे. मात्र हे सर्व डोस महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यांनी त्यासाठी ५ लसीकरण केंद्रही सुरू केले. परंतु तेथेही नोंदणीला अनेकांना अडचणी येत आहेत.
-----------
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - ४७१८५०
फ्रंटलाइन वर्कर
पहिला डोस - ३५७९५
दुसरा डोस - २२०११
४५ ते ६० वयातले
पहिला डोस - ३६१२८३
दुसरा डोस - ५२७६१
१८ ते ४५ वयातले
पहिला डोस - २१००
--------------
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी चकरा मारत आहे. मात्र कधी लस संपते तर कधी नंबर येत नाही. सर्वत्र गोंधळ आहे. लस कशी घ्यायची, हा मोठा प्रश्न आहे.
- रामनाथ पवार, ज्येष्ठ नागरिक
-----------
अठरा वर्षांपुढील लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. एक तर मोठ्या मुश्किलीने ही साइट सुरू होते. पुढे सर्व माहिती भरल्यानंतर लसीकरण केंद्र निवडताना सर्व लस आधीच बुक असल्याचे त्यावर दिसते. त्यामुळे अजूनही नोंदणी करता आलेली नाही.
- राजेंद्र यळकर, तरुण
--------------
गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर जात आहे. परंतु तेथे केवळ दुसरा डोस सुरू असल्याचे सांगितले जाते. पहिला डोस घेण्यासाठी नंतर या, असे सांगितल्याने अद्याप लस मिळालेली नाही.
- मारुती शिंदे, ज्येष्ठ नागरिक
-------------