लिंपणगावच्या शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:20+5:302021-06-10T04:15:20+5:30
श्रीगोंदा : लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील लष्करातील सुभेदार राजेंद्र पांडुरंग खुळे (वय ५१) यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावात ...

लिंपणगावच्या शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
श्रीगोंदा : लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथील लष्करातील सुभेदार राजेंद्र पांडुरंग खुळे (वय ५१) यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावात मिरवणूक काढण्यात आली.
‘राजेंद्र खुळे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा जयघोषात बुधवारी सकाळी लिंपणगाव येथील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
सुभेदार राजेंद्र खुळे हे लष्करात जम्मूमधील नाग्रोटमध्ये सेवेत होते. रविवारी पहाटे हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मागे पत्नी सुरेखा, आई छबूबाई, शिवम, रुचिरा, शिवानी ही तीन मुले आहेत.
राजेंद्र खुळे हे मुंढेकरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. २७ वर्षांपूर्वी लष्करात ते शिपाई म्हणून भरती झाले होते. त्यांनी सुभेदारपदापर्यंत मजल मारली. रविवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दोन दिवसांनंतर लिंपणगाव येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. लिंपणगाव येथील क्रीडांगणाला शहीद जवान राजेंद्र खुळे यांचे नाव देण्यात येणार आहे, असे सरपंच शुभांगी सूर्यवंशी यांनी सांगितले.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, केशव मगर, बाळासाहेब नाहाटा, दीपक भोसले, बाळासाहेब शेलार, ॲड. अशोक रोडे, प्रा. फुलसिंग मांडे, मेजर संदीप लगड, मेजर संदीप सांगळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तहसील प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगीता ढोले, टिळक भोस, जिजाबापू शिंदे, सुनील जंगले, बाळासाहेब गिरमकर, सुभाष शिंदे आदींची उपस्थिती होती.
---
...अन् मुलांची भेट राहून गेली
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राजेंद्र खुळे यांना गावाकडे येण्यासाठी सुटी मिळाली नाही; अन्यथा ते मुलांना भेटण्यासाठी मागील महिन्यात येणार होते. कोरोना संपला की, घरी येतो असे त्यांनी मुलांना सांगितले होते. मात्र, नियतीने बाप-लेकरांची भेटच घडू दिली नाही.
---
...आपण तर शहीद बापाची मुले
वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यापूर्वी मुलगा शिवम मोठ्याने रडू लागला. त्यावर बहीण रुचिरा म्हणाली, अरे रडतोस काय? आपण तर शहीद बापाची मुले आहोत, असे सांगून बहिणीने भावाला धीर दिला.
----
०९ लिंपणगाव जवान
लिंपणगाव येथील राजेंद्र खुळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.