शिर्डीत पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:23 IST2017-09-11T19:21:23+5:302017-09-11T19:23:51+5:30
शिर्डीत मयत झालेल्या इंदापूर (जिल्हा पुणे) तालुक्यातील नरसिंगपूरच्या बाळू बंडालकर यांच्याकडे नातेवाईकांनी पाठ फिरविली. त्यामुळे सोमवारी त्यांच्यावर पोलिसांनाच अंत्यसंस्कार करावे लागले़ यावेळी बंडालकर यांचा बारा वर्षाचा मुलगा सोमनाथ उपस्थित होता़

शिर्डीत पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
शिर्डी : शिर्डीत मयत झालेल्या इंदापूर (जिल्हा पुणे) तालुक्यातील नरसिंगपूरच्या बाळू बंडालकर यांच्याकडे नातेवाईकांनी पाठ फिरविली. त्यामुळे सोमवारी त्यांच्यावर पोलिसांनाच अंत्यसंस्कार करावे लागले़ यावेळी बंडालकर यांचा बारा वर्षाचा मुलगा सोमनाथ उपस्थित होता़.
८ सप्टेंबरला सायंकाळी पावणेसात वाजता लहानग्या सोमनाथने साईनगर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर पडलेल्या आपल्या वडिलांना साईनाथ रूग्णालयात दाखल केले होते़. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते़ यानंतर डॉक्टरांनी बंडालकर यांचा मृतदेह साईनाथ रूग्णालयाच्या शवागारात ठेऊन पोलिसांना कळविले. मुलगा सोमनाथ याच्याकडील मोबाईलवरून घरी नरसिंगपूरला संपर्क केला़ नातेवाईकांनी येतो-येतो असे सांगत दोन दिवस लावले़. दरम्यान रूग्णालयातील कर्मचा-यांनी मुलाची काळजी घेतली़ दोन दिवसानंतर मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने रूग्णालय प्रशासन गोंधळून गेले़. अनेक समस्यांशी सामना करीत रूग्णांना मोफत सेवा देणाºया साईनाथ रूग्णालय प्रशासनाच्या माणुसकी अंगाशी आली़ अनेकांनी जाब विचारायला सुरूवात केली़.
अखेर रविवार १० सप्टेंबरला दुपारी मृतदेह शवागारातून हलविल्यानंतर शवागाराची संपूर्णपणे साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात आले़. दरम्यान सोमनाथने दिलेल्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही नातेवाईक प्रतिसाद देईनात, त्यांनी मोबाईलही बंद केले़. अखेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या सुचनेनुसार सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून पोलीस कर्मचा-यांनी मुलाच्या साक्षीने त्याचे वडील बाळू बंडालकर यांच्या मृतदेहावर शिर्डीच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले़.