फुल खिले गुलशन.. गुलशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 16:23 IST2017-09-10T16:13:39+5:302017-09-10T16:23:13+5:30

नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या अकोळनेर येथे रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे.

Full blooms Gulshan .. Gulshan! | फुल खिले गुलशन.. गुलशन !

फुल खिले गुलशन.. गुलशन !

ठळक मुद्देझेंडू, शेवंती बरोबर अस्टर, जर्बेरा यासारख्या फुले सणासुदीसाठी सज्जअकोळनेर, कामरगाव, भोरवाडी, चास, गोरेगाव, सुपा फुलांचे आगारदिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणीमारीगोल्ड, रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी असे शेवंतीचे प्रकार आहे.झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो असे प्रकार आहे.

योगेश गुंड
अहमदनगर : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या अकोळनेर येथे दसरा-दिवाळी या सणांना सुगंधित करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती बरोबर अस्टर, जर्बेरा यासारख्या फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. समाधानकारक पावसामुळे यंदा फुलांचे उत्पादन वाढणार असून फुलांच्या बाजारभावात तेजी राहणार असल्याचे सांगण्यात येते. येथील फुलांना देशभरातील फुलांच्या बाजारातून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे.
काही दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्र उत्सव आणि दसरा तसेच त्यानंतर लगेच येणा-या दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर (ता.नगर) येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेर बरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास तसेच पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा याठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून याभागात फूल शेती केली जाते. एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. तर यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी यासारखे शेवंतीचे प्रकार असून यांची लागवड करण्यात आली आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी वेळेत पाऊस आल्याने फुलांचे उत्पादन वाढणार आहे.
झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो यासारख्या व्हरायटी आहेत. अकोळनेर येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी होत असते, असे अरुण जाधव, रत्नाकर शिंदे, राहुल मेहेत्रे या शेतक-यांनी सांगितले.

शेवंतीचा भाव चारपटीने वाढणार
यंदा चांगल्या पावसामुळे झेंडू-शेवंती या फुलांचे उत्पादन वाढणार असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चारपटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव आज प्रती किलो २०० रुपये असला तरी सणासुदीत तो ३०० रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे.

शेततळ्यांचा फूल शेतीला आधार
मागील काही वर्षे दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट झाली होती. शेतक-यांनी पदरमोड करून टँकरने पाणी देऊन फुले जगवली होती.यावर्षी ५० टक्के फूल उत्पादक शेतक-यांनी शेततळे उभारल्याने फुलांच्या शेतीला मोठा आधार झाला. यामुळे फुलांना वेळेत पाणी मिळू शकले.
-----
सध्या पितृपक्ष असल्याने फुलांना भाव कमी झाले आहेत. मात्र दसरा व दिवाळीमध्ये फुलांचे भाव वाढतील. यंदा पावसामुळे फुलांचे उत्पादन चांगले आहे.
-दशरथ गारुडकर, फूल उत्पादक
-----
एक एकर शेवंतीच्या लागवडीसाठी साधारण ५० हजार रुपये खर्च येतो. कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हा खर्चही वसूल होत नाही. यामुळे ही शेती बिनभरवशाची आहे.
-बापूराव शेळके, फूल उत्पादक
-------
आम्ही २ एकर फुलांची लागवड केली आहे. ठिबकद्वारे पाणी दिले. यावर्षी पाऊस वेळेत झाल्याने टँकरचा खर्च वाचला आहे. यामुळे पुढील वर्षी उत्पादन आणखी वाढणार आहे.
-संतोष शेळके, फूल उत्पादक

Web Title: Full blooms Gulshan .. Gulshan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.