आघाडीत संघर्षाची चिन्हे

By Admin | Updated: August 19, 2014 02:15 IST2014-08-19T01:43:03+5:302014-08-19T02:15:07+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाला सुरूवात होणार आहे.

Frontiers signs of struggle | आघाडीत संघर्षाची चिन्हे

आघाडीत संघर्षाची चिन्हे




अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाला सुरूवात होणार आहे. मात्र, जिल्ह्यात मतदारसंघातील संभाव्य अदला-बदलाबाबत आघाडीतील दोन्ही पक्षाची चर्चा झालेली नाही. दोघांकडून नगरशहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघावर दावा सांगण्यात येत असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीबाबत शिक्कामोर्तब झाल्यानंतर ज्या मतदारसंघात दोनपेक्षा जास्त वेळी पराभव झालेल्या जागा आघाडीतील दुसऱ्या मित्र पक्षाला देण्याचा निर्णय झाला होता. याच फॉर्मुल्याच्या आधारे जिल्ह्यातील नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात काँग्रेसचा सलग चार वेळा पराभव झालेला आहे. तशीच अवस्था नगर शहर मतदारसंघाची आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पक्षीय बैठकीत याबाबतचा अहवाल देण्यात आलेला आहे. कर्जत-जामखेड आणि नगरशहरात जोर लावल्यास या ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या वाटाघाटीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील असा विश्वास पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांबाबत अंतिम निर्णय खासदार पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पालकमंत्री मधुकरराव पिचड घेणार आहेत. दुसरीकडे पारनेर, कोपरगाव आणि राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीचा पराभव होत असून या जागेवर उमेदवार उभा करायचा की त्या मित्र पक्षाला द्यायच्या यावर राष्ट्रवादीत मौन आहे. यात राहुरी, कोपरगाव वगळता अन्य ठिकाणी पक्षाकडे सध्या तरी प्रबळ उमेदवार नाही आणि ही वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींनाही माहिती आहे.
नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसचा आहे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आलेले आहे. दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असले तरी मतदारसंघातील संभाव्य बदलाबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय घेण्यात येईल. शहर मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल आणि तो अंतिम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Frontiers signs of struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.