पारनेर येथे मोर्चा, ठिय्या
By Admin | Updated: July 23, 2014 00:16 IST2014-07-22T23:19:29+5:302014-07-23T00:16:52+5:30
पारनेर : पारनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राहुल शिंदे मित्र मंडळाच्यावतीने मंगळवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला
पारनेर येथे मोर्चा, ठिय्या
पारनेर : पारनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राहुल शिंदे मित्र मंडळाच्यावतीने मंगळवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला तर पारनेर एस.टी.आगारातील कारभाराविरोधात युवकांनी ठिय्या आंदोलन केले. भाळवणीत एस.टी.तील गर्दीमुळै तीन मुली जखमी झाल्याने पालक व ग्रामस्थांनी दोन तास आंदोलन केले.
पारनेर तहसीलवर मोर्चा
पारनेर तालुक्यात अपुरा पाउस पडल्याने शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे तालुका दुष्काळी जाहीर करावा तसेच जनावरांच्या छावण्या तातडीने सुरू करण्याची मागणी करीत राहुल शिंदे मित्र मंडळाच्यावतीने मंगळवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
मोर्चाचे रुपांतर सभेत
अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पारनेरच्या लाल चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राहुल शिंदे म्हणाले, पारनेर तालुक्यात अपुरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातील पिके गेली आहेत. चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे तातडीने जनावरांच्या छावण्या तसेच विद्यार्थ्यांची दुष्काळी फी माफ करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रामचंद्र मांडगे, बाजार समिती संचालक संदीप वराळ, राजाराम एरंडे, दीपक पवार, भाऊ पवार आदी हजर होते.
एस.टी.आगारात ठिय्या
पारनेर एस.टी.आगारातील चालक, वाहक वृध्द प्रवाशांशी उध्दटपणे वागत असून पारनेर, शिरूर,चिंचोली,भाळवणी,पारनेर, सुपा, निघोज, नगर यासह इतर मार्गांवर एस.टी. थांबत नसल्याने विद्यार्थी व वृध्दांचे हाल होत आहेत. उध्दट चालक, वाहकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पारनेर तालुका विद्यार्थी मंचचे प्रमुख गणेश कावरे, महेश गायकवाड, तुषार औटी, दादा शेटे यांच्यासह युवकांनी आगारप्रमुख आदिक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी चालक, वाहकांना एस.टी.थांबविण्याबाबत सुचना देण्यात येऊन जे कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
भाळवणीत दोन तास रास्ता रोको
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सोमवारी सकाळी पावणेसात भाळवणीहून नगरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानंतर दरवाजा उघडाच असताना एस.टी. पुढे नेल्याने तीन विद्यार्थीनी जखमी झाल्या. यामुळे संतप्त पालकांनी दोन तास रास्तारोको केला.
आंदोलकांशी चर्चा
भाळवणीचे उपसरपंच शंकर रोहोकले, अधिकारी तातडीने भाळवणीत दाखल होऊन त्यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा केली. सकाळी नगरला एस.टी.सोडाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)
औटींची दहशत
आमदार विजय औटी यांनी दुष्काळाकडे दुर्लक्ष केले असून आम्ही त्यांना मदत करून तोटा झाल्याचे व त्यांच्या दहशतीमुळे अधिकाऱ्यांचे तालुक्यात प्रभारीराज आहे, असा आरोप राहुल शिंदे,संभाजी रोहोकले, सीताराम खिलारी यांनी केला.
तहसीलदारांचा निषेध
पारनेरचे तहसीलदार दत्तात्रय बाहुले हे दुष्काळाच्या महत्वाच्या प्रश्नावरील मोर्चावर उत्तर देण्याऐवजी निघोज येथील राजकीत कार्यक्रमाला गेल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. नायब तहसीलदार फुलारी यांना निवेदन देण्यात आले.