अंगणवाडी सेविकांचा ‘झेडपी’वर मोर्चा
By Admin | Updated: August 10, 2016 00:25 IST2016-08-10T00:02:07+5:302016-08-10T00:25:23+5:30
अहमदनगर : अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला

अंगणवाडी सेविकांचा ‘झेडपी’वर मोर्चा
अहमदनगर : अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयसीडीएस योजनेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होवू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
युनियनच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत करावे. बँकेकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या मानधनाची माहिती व्यवस्थित मिळत नाही. यामुळे त्यांना मानधनाची दर महिन्याची स्लीप देण्यात यावी.
मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रुपांतर करण्यात यावे, सेवकांचे दर महिन्याचे भत्ते दर महिन्याला अदा करण्यात यावेत. प्रकल्पाच्या उद्दिष्टा व्यतिरिक्त इतर कामाचा भार लादू नये. शासनाच्या एकरकमी योजनेचा लाभ सेविका-मदतनिसांना देण्यात यावा, मासिक अहवाल सादर करण्यासाठी विवरण पत्र उपलब्ध करून द्यावेत.
आहार शिजवणाऱ्या बचत गटांची बिले प्रकल्पाकडे थकीत आहेत. त्याची चौकशी होवून बचत गटांना ते अदा करण्यात यावे. इंधन बिल दरमहा अदा करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. राजेंद्र बावके, बाळासाहेब सुरूडे, शरद संसारे, जीवन सुरूडे यांनी केले.
(प्रतिनिधी)