स्वप्नील लोणकरच्या स्मृती जपण्याचा मित्रांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:02+5:302021-07-16T04:16:02+5:30
आंबेगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्वप्नील हा विद्यार्थी होता. तेथे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी त्याचा संपर्क आला. महाविद्यालयातील शिवामृत सहयोग ग्रुप ...

स्वप्नील लोणकरच्या स्मृती जपण्याचा मित्रांचा प्रयत्न
आंबेगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्वप्नील हा विद्यार्थी होता. तेथे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी त्याचा संपर्क आला. महाविद्यालयातील शिवामृत सहयोग ग्रुप या संघटनेशी स्वप्नील सक्रियरित्या जोडलेला होता. यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील सोमेश कुलकर्णी व राज्यातील अनुजा देशपांडे, शुभम थावरे, प्रीती श्रीवास्तव, आकाश बोरुडे हे मित्र त्याच्यासमवेत काम करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वप्नीलने लिहिलेल्या कविता, त्याने कोविड काळात केलेले सामाजिक कार्य उजेडात आणण्याचा प्रयत्न त्याचे मित्र करत आहेत.
स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे समाजाने एक मोठे व्यक्तिमत्त्व गमावले असून ती एक मोठी सामाजिक हानी असल्याचे मत त्याचे मित्र व्यक्त करत आहेत. महाविद्यालयात नाटके, कवी संमेलने, शिवजयंती या सांस्कृतिक चळवळीपासून ते प्लाझ्मादान, जलयुक्त शिवार अभियानाशी त्याची नाळ जोडलेली होती. एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या अनेक देशप्रेमींपैकी स्वप्नील एक होता. वयाच्या चोविसीतच स्वप्नील हा पुण्यातील अनेक संघटनांचा भाग बनलेला होता. त्याने स्वत:ची पंचमुखी फाउंडेशन ही सामाजिक संस्थाही उभारली होती. त्याने आजवर २७ वेळा प्लाझ्मादान केले. रक्तदान शिबिरे घेतली. कोविड संकटात रुग्णांना बेड्स मिळवून देण्यासाठीही तो झटला.
सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्नील याचे स्वप्न भलेही अपूर्ण राहिले. मात्र तत्पूर्वी विद्यार्थी दशेतच तो एक सामाजिक अजेंडा घेऊन निघालेला होता. त्यामुळे आगामी काळासाठी एक उत्तम लोकसेवक समाजाने गमावल्याची भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली आहे.
आपल्या काही मोजक्या कवितांमधूनही स्वप्नील व्यक्त झाला आहे. त्याच्यातील कल्पनाशक्तीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ही कविता त्यापैकीच एक...
खरंच जगतोय मी?
की जगता जगता मरतोय मी
आहे मनही अगदी अस्थिर, अशांत
फक्त उरलोय मी आणि माझ्यातील एकांत
खरंच होता तो नजरांचा मेळ?
की खेळला गेलेला एक निष्ठूर खेळ
कहाणीचा झालाय पुन्हा तोच अंत
आणि उरलोय मी आणि माझ्यातील एकांत
-----