प्राथमिक शिक्षकांमध्ये फ्री-स्टाईल
By Admin | Updated: July 21, 2014 00:30 IST2014-07-20T23:57:23+5:302014-07-21T00:30:03+5:30
अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधरण सभेत गोंधळ आणि हाणामाऱ्यांची परंपरा कायम राहिली. सभा सुरू होण्यापूर्वीच व्यासपीठावर सत्ताधारी आणि विरोधकात फ्री-स्टाईलने हाणामारी, धक्काबुक्की झाली
प्राथमिक शिक्षकांमध्ये फ्री-स्टाईल
अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधरण सभेत गोंधळ आणि हाणामाऱ्यांची परंपरा कायम राहिली. सभा सुरू होण्यापूर्वीच व्यासपीठावर सत्ताधारी आणि विरोधकात फ्री-स्टाईलने हाणामारी, धक्काबुक्की झाली. सर्वप्रथम ज्ञानेश्वर माळवे यांना या हाणामारीचा प्रसाद मिळाला. त्यानंतर सुमारे तासभर चाललेल्या गोेंधळात बँकेचे अध्यक्ष महादेव गांगर्डे आणि संचालक बाबासाहेब सोनवणे यांनाही धक्काबुक्की झाली. विरोधकांचा आवाज आणि त्यांच्या प्रश्नासमोर सत्ताधाऱ्यांनी हतबल होत राष्ट्रगीत म्हणून सभेतून काढता पाय घेतला. यावेळी सत्ताधाऱ्यांना पोलीस सरंक्षणात सभागृहाबाहेर काढण्याची नामुष्की आली.
प्राथमिक शिक्षक बँकेची ९५ वी सर्वसाधारण सभा रविवारी सहकार सभागृहात पार पडली. सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांमधील सदिच्छा मंडळाचा रोहकले गट आक्रमक होता. त्यात गुरूकुल मंडळाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची साथ मिळाल्याने विरोधक प्रबळ बनले होते. १ कोटी ७६ लाख रुपयांची कोअर बँकिंगचा विषय वगळा आणि बँक व्यवस्थापक दाखवा अशी विरोधकांची मागणी होती. यावेळी सभागृहात झालेला गोंधळ शांत करण्यासाठी आलेले सत्ताधारी गटाचे माळवे यांच्यावर विरोधक तुटून पडले. व्यासपीठावरून त्यांना अक्षरश: पळून जावे लागले. अविनाश निंभोरे यांनी मारहाण करीत कपडे फाडले असल्याचा आरोप त्यांनी केला.
याच वेळी व्यासपीठावर ठेवण्यात आलेले लोड सभागृहात भिरकावण्यात आले. शाईही एकमेंकांच्या अंगावर फेकण्यात आली. यात अनेक संचालकांचे कपडे रंगले. त्यानंतर संचालक मंडळाने सभागृहातील ड्रेसिंग रुमचा आरसा घेतला. यावेळी व्यासपीठावर एकच गोंधळ सुरू होता. संजय कळमकर, संजय धामणे, रावसाहेब रोहकले, बाबासाहेब तांबे, प्रवीण ठुबे, कल्याण राऊत, राया औटी, आबासाहेब लोंढे, उमेश मेहेत्रे यांच्यासह अन्य शिक्षक जोरदार घोषणाबाजी करीत होते. कोअर बँकिंग प्रणालीची निविदा रद्द करा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सभेला बोलवा, सभासदांना लाभांश द्या, आदी मागण्या होत होत्या. यावेळी माईक खेचाखेची प्रयत्न झाला.अखेर रोहकले आणि कळमकर यांनी सभासदांना आवाहन करीत शांत राहण्याची सूचना केली. अध्यक्ष गांगर्डे यांनी व्यासपीठावर येऊन सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पळून जाणार नाहीत, असा शब्द द्यावा, अशी मागणी केली. यावेळी पुन्हा व्यासपीठावर माईकवर ताबा मिळविण्यावरून संचालक आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. कळमकर यांनी सभासदांचा लाभांश खाणाऱ्या आणि कोअर बँकिंग प्रणालीत भ्रष्टाचार करण्याऱ्या श्रेष्ठींची नावे सभासदांना सांगावी अशी मागणी केली. त्यावरून पुन्हा गोंधळ सुरू झाला. व्यासपीठावर सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधक अधिक असल्याने अध्यक्ष गांगर्डे यांनी आधी खाली बसा मग सभा सुरू करू असे बजावले. त्यानंतर सभेला सुरूवात झाली.
व्यासपीठाचा ताबा पोलिसांनी घेतला. त्यावरही शिक्षक सभासदांनी आक्षेप घेत, पोलिसांनी सभेच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याची मागणी केली.
पावणे बाराच्या सुमारास सभेला सुरूवात झाली. अध्यक्ष गांगर्डे यांनी शांततेचे आवाहन करीत बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाली असून व्याजावर अर्धा टक्का व्याजदर कमी करण्यात आला असून १ आॅगस्टपासून आणखीण एक टक्का व्याज कमी करण्याचे आश्वासन दिले. मागील वर्षीच्या इतिवृत्त मंजुरीचा विषय मंजूर मांडला.
त्यावर निंबोरे यांनी माईक ताब्यात घेत पहिला विषय सभासदांना मंजूर की नाही, याबाबत विचारताच सभागृहाने बहुमताने नांमजूर केला. त्यावर सत्ताधाऱ्यांच्या निवड कार्यकर्त्यांनी सर्व विषय मंजुरीचे फलक सभागृहात झळकविले. त्यावरून सभासदांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली आणि एकच गोंधळ झाला. त्यात अध्यक्ष गांगर्डे यांनी सर्व विषय मंजूर असल्याची घोषणा दिली आणि त्याच दरम्यान राष्ट्रगीत सुरू झाले. सभासदांमधून अध्यक्ष गांगर्डे यांच्यावर केळी आणि कागदी बोळे भिरकविण्यात आले.
यावेळी राष्ट्रगीत संपल्यानंतर विरोधक आपल्याला घेरतात की काय? या शंकेने व्यासपीठावरून संचालक मंडळ ड्रेसिंग रुमकडे पळाले. या दरम्यान निंभोरे आणि अध्यक्ष गांगर्डे यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी संचालक सोनवणे हे होते. त्यानंतर विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी ड्रेसिंग रुमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने तो तुटला नाही. यावेळी संचालकांचा घरादाराचा उध्दार करण्यात आला. दरम्यान राष्ट्रगीत संपल्यावर संचालक मंडळाकडून राष्ट्रगीताचा अपमान झाला आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ठुबे यांनी केली. त्यानंतर संचालक मंडळाचा निषेध करण्यात आला तर सत्ताधाऱ्यांना पोलीस संरक्षणात सभागृहाबाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)
तंबाखू, मावा पुड्यांचा खच
सभा सुरू होण्यापूर्वीच सभागृहात गोंधळाची परिस्थिती होती. सभेत शिक्षकांनी एकमेंकांचा उध्दार करण्यासोबत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सभा संपल्यानंतर साऊंड व्यवस्थेचा कर्मचारी कॉडले माईक घेण्यासाठी गेला असता त्यांच्यावर सभासद चिडले आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.
सभागृहात दोन ड्रेसिंग रुम आहेत. गोंधळ आणि हाणामारी झाली त्यावेळी एकात संचालक मंडळ आणि दुसऱ्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आसरा घेतला. संतप्त शिक्षकांनी दोन्ही रुमचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे कर्मचारी चांगलेच भयभित झाले होते. पोलीस आल्यानंतर थरथरत्या अवस्थेत रुमच्या बाहेर आले.
व्यासपीठावर निंभोरे यांनी एक हजार रुपयांची नोट नाचवत एम.डी. (व्यवस्थापक दाखवा) अशी घोषणा दिली. संचालकांसाठी हजार रुपयांची ओवाळणी या शब्दात निषेध व्यक्त केला.
अनेक शिक्षक सभेला मद्यप्राशन करून आले होते. व्यासपीठावर असणाऱ्या गाद्या आणि लोढ अनेक वेळा सभागृहात भिरकावण्यात आले. व्यासपीठावर तंबाकू आणि माव्याच्या पुड्या पडलेल्या होत्या.
शिक्षकांनी गोंधळ झाल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस उपनिरिक्षक खंडेराव उजारे यांच्याशी अनेक वेळा शिक्षकांचे शाब्दीक खटके उडाले. अखेर पोलिसांना व्यासपीठाचा ताबा घ्यावा लागला. तरी परिस्थिती नियंत्रणात नव्हती.
‘त्या’ शिक्षकास सोडले
शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाहून बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी मधुकर शिंदे नावाच्या शिक्षकाला पकडून नेले. शिंदे यांच्याकडे पुतळा होता. सभेच्या ठिकाणी पुतळा दहन करण्याची परवानगी आवश्यक असून शिंदे यांनी ती न घेतल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यावरून त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
मात्र, शिंदे यांनी सभागृहात अनोळखी शिक्षकाने त्यांच्या हातात पुतळा दिला आणि मी परत येतो, असे सांगून तो निघून गेला. मात्र, परत आला नाही. दरम्यान, पोलिसांनी शिंदे यांना पकडले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
सत्ताधारी संचालकांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार. कोअर बॅकिंगचा विषय नामंजूर करण्यात आलेला आहे. मात्र, तक्रार करून सहकार खाते सत्ताधाऱ्यांना पाठिशी घालतात. जिल्हा उपनिबंधक आमच्या पत्राचे साधे उत्तर देत नाहीत. यामुळे त्यांच्या कार्यालयावर सर्व मंडळे एकत्रीत मोर्चा काढणार.
-रावसाहेब रोहकले,
शिक्षक नेते, सदिच्छा मंडळ .
सभासदांच्या मागणीवर आम्ही सभेला सुरूवात झाली. एक ते दहा विषयांचे वाचन झाल्यावर त्यावर विषयनिहाय चर्चा करावयाची होती. मात्र, विरोधकांना सभा होऊन द्यावयाची नव्हती. यामुळे त्यांनी गोंधळ घातला. सर्व विषयांना मंजुरी मिळाली असून आम्ही सभासदांसाठी दीड टक्का व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विरोधकांना गोंधळ घालायचाच होता.
-महादेव गांगर्डे,
अध्यक्ष, शिक्षक बँक .
शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचा पूर्वनियोजित कट होता. सदिच्छा मंडळाच्या दोन्ही गटांनी सामान्य सभासदांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन दिली नाही. सभेत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षीत असताना ती जाणीवपूर्वक उधळण्यात आली. सभेतील सर्व विषय नामंजूर करण्यात आले आहेत.
-कल्याण राऊत,
स्वभिमानी ऐक्य मंडळ.
सभेत झालेला गोंधळ हा सर्वसामान्य सभासदांचा उद्रेक आहे. सत्ताधाऱ्यांनी बँकेत घोटाळे घालण्यासोबतच सभासदांचा लाभांश खाल्ला. ज्या श्रेष्ठीच्या इशाऱ्यावर संचालक मंडळ नाचत आहे. त्याचे नाव एकदा जाहीर करावे. यापुढे बँके विरोधातील लढा तीव्र करणार.
-संजय कळमकर,
शिक्षक नेते, गुरूकुल मंडळ.