वैद्यकीय क्षेत्रातील युवक-युवतींची विनामोबदला रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:06+5:302021-05-15T04:20:06+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी लोकवर्गणीतून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील युवक-युवती विनामोबदला ...

वैद्यकीय क्षेत्रातील युवक-युवतींची विनामोबदला रुग्णसेवा
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी लोकवर्गणीतून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील युवक-युवती विनामोबदला सेवा करत आहेत.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कोळाईदेवी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटरमध्ये ७५ बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली. परंतु, या ठिकाणी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी कोठून आणणार, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. अशात ज्येष्ठ नेते हेमंत नलगे यांचा मुलगा डॉ. ॠषिकेश नलगे याने नुकतीच नगर येथील काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयातून बीएचएमएस पदवी प्राप्त केली आहे. त्याने या कोविड सेंटरमध्ये कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता गावातील व परिसरातील कोरोना रुग्णांसाठी सेवाकार्य सुरू केले. त्याला साथ करण्यासाठी नगर येथील गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयतून बीएएमएस पदवी प्राप्त केलेली कोळगाव येथील युवती डॉ. वैष्णवी धस हिने पुढाकार घेतला.
डॉ. वैष्णवी ही काय मोबदला मिळेल का, याची अपेक्षा न करता सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटरमध्ये सेवाकार्य बजावत आहे. गावातीलच सुनीता उजागिरे यांनी परिचारिका म्हणून पुण्यातील खासगी रुग्णालयातील चांगली नोकरी सोडून त्या या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. या सर्वांना गावातील युवक मनोज अर्जुन मचाले, राजेंद्र लगड, राजेश उजगरे, सचिन चंदन यांचे सहकार्य मिळत आहे. या कोविड सेंटरमध्ये २३० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी १५१ रुग्ण घरी कोरोनामुक्त होऊन घरी परतले. काहींना उपचारासाठी इतरत्र पाठविण्यात आले. सध्या ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून गावातील नेत्यांंनी सर्व हेवेदावे व राजकारण बाजूला ठेवूून कोविड सेंटर सुरू केले. पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड व ज्येष्ठ नेते हेमंत नलगे यांचे कार्यकर्ते एकत्र येऊन कोविड सेंटरचे कामकाज पाहत आहेत.
---
कोळगावच्या ग्रामस्थांनी सुरू केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील कोविड सेंटरचे आरोग्य सेवेसाठी काम करणारे आरोग्य सेवक व स्वयंसेवकांना ग्रामस्थ पगार देऊ शकत नाही. हे सर्व स्वयंसेवक निरपेक्षपणे कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना कोविड सेंटरसाठी जमा होत असलेल्या निधीतून काही ना काही मानधन देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- हेमंत नलगे,
संचालक, नागवडे साखर कारखाना
---
१४ कोळगाव कोविड सेंटर
कोळगाव येथील कोविड सेंटरमध्ये विनामोबदला सेवा बजावणारे युवक-युवती.