पाथर्डी तालुक्यात चौथा बिबट्या जेरबंद

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:32+5:302020-12-05T04:36:32+5:30

तिसगाव : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील शेरी मळ्यात बुधवारी दुपारी भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे बिबट्या जेरबंद ...

Fourth leopard seized in Pathardi taluka | पाथर्डी तालुक्यात चौथा बिबट्या जेरबंद

पाथर्डी तालुक्यात चौथा बिबट्या जेरबंद

तिसगाव : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील शेरी मळ्यात बुधवारी दुपारी भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. शेजारील पिंजऱ्याऐवजी मुख्य पिंजऱ्यातच बोकड भक्ष्य ठेवण्याची वन विभागाची युक्ती कमालीची परिणामकारक ठरली. तालुक्यात जेरबंद झालेला हा तिसरा बिबट्या आहे.

मुंजोबा वस्तीवरील सुखदेव मरकड यांच्या पाळीव कुत्र्याचे शिकारीची घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी पाणतासवाडी, घाटशिरस रस्त्यावर चैतन्यनगर भागातील रहिवासी खलील दाऊबा शेख यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार बिबट्याने केली. त्या शिकारींचा झाडाझुडपातील माग आदिवासी समाजातील तरुणांच्या मदतीने काढीत तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांनी ठसे घेतले. त्यानुसार बिबट्यावर हेरून पिंजरा भक्ष्य ठेवून पाल्या-पाचोळ्यांनी झाकला.

गुरुवारी दैनंदिन पाहणी करताना बिबट्या जेरबंद झाल्याचे आढळून आले. सकाळी आठ वाजताच शेरी मळ्यातील अर्जुन बापूराव मरकड यांचे शेत तलावाजवळील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती सार्वत्रिक झाली. त्यानंतर ग्रामस्थांची तोबा गर्दी लोटली. गर्दीमुळे बिबट्या आणखीनच बिथरला व डरकाळ्या टाकीत पिंजऱ्याला धडका मारू लागला. सुरक्षेमुळे वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ तिसगावमार्गे त्याला अहमदनगर येथे हलविले.

दरम्यान, पकडलेला बिबट्या नर जातीचा असल्याचा प्राथमिक लक्षणांवरून अंदाज आहे. तज्ज्ञांच्या तपासणीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर, एम. वाय. शेख यांनी सांगितले. आमदरा येथील श्रेया साळवे, पाणतासवाडी येथील सार्थक बुधवंत या दोन चिमुरड्यांसह काही पाळीव प्राण्यांचा बिबट्याने जीव घेतला आहे. त्यामुळे बहुचर्चित नरभक्षक बिबट्या हाच असल्याचा कयास रहिवाशांमधून बांधला जात आहे.

चौकट..

लेण्याई मंदिराला बिबट्याच्या वास्तव्याच्या तक्रारी

लेण्याई मंदिर परिसरात बिबट्या रहिवास असलेल्या सर्वाधिक तक्रारी आहेत. आतापर्यंत तालुक्यात तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तरीही गुरुवारी दुपारी लेण्याई मंदिराजवळील गुहेपर्यंत वनकर्मचाऱ्यांची धडक शोधमोहीम सुरू होती.

फोटो दोन ०३ मढी, १

मढी परिसरात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या. दुसऱ्या छायाचित्रात लेण्याई मंदिर परिसरात शोधमोहिमेवर असलेले वन कर्मचारी.

Web Title: Fourth leopard seized in Pathardi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.