नेवाशाच्या चौदा गावांनी वेशीवरच रोखला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:06+5:302021-04-27T04:22:06+5:30
नेवासा : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र रुग्णसंख्येत दिवसेंदिवस ...

नेवाशाच्या चौदा गावांनी वेशीवरच रोखला कोरोना
नेवासा : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंतेची बाब असली तरी तालुक्यातील चौदा गावांनी एप्रिल महिन्यात कोरोनाला वेशीवरच रोखले आहे, तर मागील पंचवीस दिवसात तालुक्यात दोन हजार ६३३ रुग्णांची भर पडली आहे.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी कोरोनाने तालुक्यातील विविध गावांमध्ये विळखा घट्ट करत तालुक्यातील १३१ गावांपैकी तब्बल ११७ गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील सुकळी खुर्द, सुकळी बुद्रूक, बोरगाव, चिंचबन, इमामपूर, म्हसले, रामडोह, बेल्हेकरवाडी, धनगरवाडी, वाशीम, माळेवाडी, म्हाळापूर, मडकी व पानेगाव या चौदा गावांमध्ये १ एप्रिलपासून एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद नाही. त्याच प्रमाणे नागापूर, मोरगव्हाण, लोहारवाडी, झापवाडी, लेकुरवाळी आखाडा, वंजारवाडी, मुरमे, खेडले काजळी या गावांमध्ये मागील चोवीस दिवसात प्रत्येकी एक-दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
मागील २५ दिवसांमध्ये तालुक्यात दोन हजार ६३३ रुग्णांची नव्याने वाढ झाली. तालुक्यातील बाधित असलेल्या ११७ गावांमधील सर्वाधिक ३५० रुग्ण नेवासा खुर्द येथे असून, त्या खालोखाल सोनई १८७, भेंडा बुद्रूक १४२, कुकाणा १०४, नेवासा बुद्रूक १०७, घोडेगाव १२०, तामसवाडी ७६, मुकिंदपूर ७७, भानसहिवरा ७३, चांदा ६०, वडाळा ५९ येथे रुग्ण आढळून आले आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सरासरी पन्नास ते साठ रुग्ण तालुक्यात आढळून येत होते. मात्र मागील तेरा दिवसांपासून रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे.
सरासरी शंभर ते एकशे तीस रुग्ण दररोज वाढत असून, नेवासा शहरातही सातत्याने रुग्णवाढ होत आहे.