कुकडी कालव्यावर चोवीस तास पहारा
By Admin | Updated: April 18, 2016 00:34 IST2016-04-18T00:21:58+5:302016-04-18T00:34:35+5:30
अहमदनगर : कुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे उद्भव भरण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आवर्तन सोडण्यात आले़

कुकडी कालव्यावर चोवीस तास पहारा
अहमदनगर : कुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे उद्भव भरण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आवर्तन सोडण्यात आले़ कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले असून, कालवा परिसरात पोलीस, महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची करडी नजर असणार आहे़ नियंत्रण ठेवण्यासाठी १३ पथके नियुक्त करण्यात आले आहेत़ त्यामुळे कालव्याला छावणीचे स्वरुप आले आहे़
दक्षिण नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे जामखेड शहराला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तलावातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता़ दक्षिण नगर जिल्ह्यासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे़ मागील आठवड्यात कुकडीतून आवर्तन सुटणार असल्याची चर्चा होती़
मात्र, आठ दिवसानंतर काल शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुकडी प्रकल्पातून एक हजार क्युसेक वेगाने कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे़ पाणी रविवारी दुपारी पारनेर तालुक्यातील अळकुटी गावात दाखल झाले असून, ते पाणी श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील तलाव भरण्यासाठी सुरूच राहणार आहे़ एकूण २२ दिवसांचे हे आवर्तन असून, त्यातून दक्षिण नगर जिल्ह्यातील ३० तलाव भरले जाणार आहेत़ त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ पिण्याबरोबरच फळबागांसाठी पाणी देण्याची या भागातील लोकप्रतिनिधींची सुरुवातीपासूनच मागणी आहे़ श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या फळबागा आहेत़ त्यासाठी कालव्यातून शेतकरी पाण्याच्या उपसा करण्याची शक्यता आहे़ पाण्याचा अवैध उपसा होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे़ कालवा परिसरात चोवीस तास पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे़ राज्य राखीव दलाच्या तुकड्या कालवा परिसरात दाखल झाल्या असून, पाण्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)