चोर समजून चौघांना मारहाण
By Admin | Updated: July 31, 2014 00:40 IST2014-07-30T23:38:14+5:302014-07-31T00:40:58+5:30
अहमदनगर : चोर समजून चार ते पाच अनोळखी व्यक्तींना मांजरसुंबा येथील ग्रामस्थांनी बदडले. ही घटना शनिवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास घडली.

चोर समजून चौघांना मारहाण
अहमदनगर : चोर समजून चार ते पाच अनोळखी व्यक्तींना मांजरसुंबा येथील ग्रामस्थांनी बदडले. ही घटना शनिवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारहाणीत जखमी झालेले संपत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांजरसुंबा येथील १५ ग्रामस्थांविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
संपत भानुदास माळी (रा. शेडाळा, ता. आष्टी) हे त्यांच्या मित्रांसह शनिवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास मांजरसुंबा रोडने जात होते. यावेळी गावातील काही लोकांना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी गावातील १०-१५ जणांना गोळा केले. माळी व त्यांच्या मित्रांना त्यांनी अडविले. तसेच चोर समजून त्यांना मारहाण केली. यावेळी माळी व त्यांचे मित्र घाबरून पळून गेले. ग्रामस्थांनी कोणतीही चौकशी न करता मारहाण केल्याची तक्रार माळी यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणीत सोमनाथ माळी हे गंभीर जखमी झाले. सहायक फौजदार धुमाळ तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)