त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या चौघा साधूंना मारहाण; संगमनेर शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:08 IST2024-11-12T13:07:54+5:302024-11-12T13:08:04+5:30
साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार

त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या चौघा साधूंना मारहाण; संगमनेर शहरातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क , संगमनेर (जि. अहिल्यानगर) : त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या चौघा साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील कुटे हॉस्पिटलजवळ घडली. मारहाण झालेल्या चारही साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदविले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मारहाण झालेल्या साधूंपैकी एकाने सांगितले की, आम्ही त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे जात होतो. चहा घेण्यासाठी उतरलो. तो घेऊन निघालो होतो. त्यावेळी काही जण आम्हाला आडवे झाले. तुम्ही इकडे कसे काय आले, असे म्हणत त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. चार-पाच जणांनी मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी आम्हा सर्वांना बेदम मारहाण केली. मारहाण करणारे हिंदीत बोलत होते.
यापूर्वीच्या घटना...
एप्रिल २०२० मध्ये पालघर जिल्ह्यांत दोन साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. तर मुले चोरणारी टोळी समजून ४ साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगलीत २०२२ मध्ये उघडकीस आला होता.
मारहाण करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत असून, त्यांच्यावर कायदेशीररीत्या कारवाई होणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, कुणीही तणावाची परिस्थिती निर्माण करू नये.
- डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर उपविभाग
अनेकांनी केला मारहाणीचा निषेध
- साधूंना मारहाण होत असताना कुणीतरी ते मोबाइलमध्ये चित्रित केले. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
- मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर चौघेही साधू जीव वाचविण्यासाठी पळू लागले. मात्र, त्यांच्या पाठीमागे पळतच त्यांना मारहाण करण्यात आली. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी आदी हिंदुत्ववादी संघटनांसह अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.