नगर जिल्ह्यात आढळली चार बिबट्याची पिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:53+5:302021-04-01T04:21:53+5:30
श्रीरामपूर-श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरात दोन व श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाणमध्ये बिबट्याची दोन अशी जिल्ह्यात चार ...

नगर जिल्ह्यात आढळली चार बिबट्याची पिले
श्रीरामपूर-श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरात दोन व श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाणमध्ये बिबट्याची दोन अशी जिल्ह्यात चार पिले आढळून आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून पिले वनविभागाने ताब्यात घेतली आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीपात्रानजीक उक्कलगाव येथे उसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन नवजात पिले आढळून आली. दहा ते पंधरा दिवसांची ही पिले आहेत. गावातील लम्हाणबाबा शिवारातील शिवाजी गंगाधर थोरात यांच्या उसाची बुधवारी तोड सुरू होती. त्यावेळी पिले आढळून आल्याने परिसरात भीती पसरली.
श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथील सागर वराळे यांच्या उसाच्या फडात बुधवारी सकाळी बिबट्याची दोन पिले आढळली. काही वेळातच बिबट्याने (मादी) डरकाळी फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे घोडनदीकाठ परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याची पिले आढळलेल्या ठिकाणी वनरक्षक विक्रम बुरांडे, वनमजूर हनुमंत रंधवे यांनी भेट दिली. त्यांनी पिले ताब्यात घेऊन ती मुक्त केली जाणार असल्याचे सांगितले. कुकडी साखर कारखान्याचे मजूर सकाळी ऊसतोडणी करत असताना, ही बिबट्याची पिले आढळली. त्यानंतर, काही वेळातच बिबट्याची डरकाळी ऐकू येऊ लागल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.