साडेचार लाखांची शिर्डीत घरफोडी
By Admin | Updated: April 15, 2024 14:29 IST2014-09-16T01:07:45+5:302024-04-15T14:29:16+5:30
शिर्डी : अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या साईनगर इमारतीत एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास साडेचार लाखांहून अधिक ऐवज चोरून नेला़

साडेचार लाखांची शिर्डीत घरफोडी
शिर्डी : अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या साईनगर इमारतीत एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास साडेचार लाखांहून अधिक ऐवज चोरून नेला़ दुसऱ्या घटनेत सिंडीकेट बँकेतून एक लाखाची रोकड चोरट्यांनी पळविली.
साईबाबा रूग्णालयाचे डॉ़ सचिन देशमुख हे संस्थानच्या साईनगर वसाहतीतील साईचिंतन-बी-२ या इमारतीत राहतात़ त्यांची पत्नीही साईबाबा रूग्णालयात स्टाफ नर्स आहे़ शनिवारी दुपारी हे दोघेही बाहेरगावी गेले होते़ रविवारी दुपारी जेव्हा त्यांची मोलकरीण घर स्वच्छ करण्यासाठी आली असता तिला घराचे कुलूप तोडलेले आढळले़ यानंतर तिने हे वृत्त शेजाऱ्यांना व तत्काळ डॉ़ देशमुख यांना कळवले़ यानंतर घर उघडून पाहिले असता कपाटातील सामानाची उचकापाचक करण्यात आली होती़ तसेच कपाटातील लॉकर तोडून सोळा तोळे सोन्याचे विविध दागिने गायब झालेले आढळले़ शिवाय एक कॅमेराही चोरीस गेला़
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कहाळे पुढील तपास करत आहेत़ विशेष म्हणजे ज्या परिसरात ही चोरी झाली त्या परिसरात संस्थान सुरक्षारक्षकांचा वावर असतो़ तसेच बाहेरच्या बाजूने संरक्षक भिंतही आहे़ या पूर्वी या इमारतीत एक पोलीस उपअधीक्षक, तसेच एका शिक्षकाचीही अशीच घरफोडी झाली होती़ कोणीतरी पाळत ठेवून दिवसा हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे़ मात्र भरवस्तीत झालेल्या या घरफोडीने शहरात दहशतीचे वातावरण आहे़ (तालुका प्रतिनिधी)