गावठी हातभट्टीचे चार अड्डे उद्ध्वस्त; नगरमधील घटना, २ लाखांचा माल जप्त
By अण्णा नवथर | Updated: May 5, 2023 17:44 IST2023-05-05T17:43:51+5:302023-05-05T17:44:57+5:30
साडेचार हजार लिटर कच्चे रसायन जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी हातभट्टीचे चार अड्डे उद्ध्वस्त; नगरमधील घटना, २ लाखांचा माल जप्त
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावठी हातट्टीच्या अड्डयांवर छापे टाकत स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख रुपये किमतीचे साडेचार हजार लिटर कच्चे रसायन जप्त केले. तसेच पाच जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्याम गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहर व परिसरातील अवैध व्यावसायांविरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे गावठी हातभट्टीचे अड्डे सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध चार गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयांवर छापे टाकले असून, एकूण २ लाख ४४ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन ताब्यात घेतले.
या प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अर्जुन भिवाजी गव्हाणे ( ५०, रा. वाळूंज, ता. नगर), गणेश पोपट गिरे ( ३०, रा. गिरेवस्ती खंडाळा, ता. नगर), अशोक मच्छिंद्र कदम ( ३६, रा. निंबळक, ता. नगर ), युवराज बजरंग गिरे ( ३८, रा. खंडाळा. ता. नगर) यासह एक महिला, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.