टाकळीभान येथे चार एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 19:49 IST2018-02-28T19:49:01+5:302018-02-28T19:49:47+5:30
टाकळीभान येथे बुधवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाला.

टाकळीभान येथे चार एकर ऊस खाक
टाकळीभान : टाकळीभान येथे बुधवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाला.
दुपारच्या वेळी ही आग लागल्याने तरूणांनी आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे शेजारचा सुमारे पंधरा ते वीस एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.
येथील गट क्रमांक ४० मध्ये टाकळीभानचे माजी सरपंच भाऊसाहेब मगर यांचा आठ एकर तोडणी योग्य उसाचे पीक उभे आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शेतातून गेलेल्या विजेच्या तारा एकमेकांना चिकटल्याने आग लागली. आगीचा लोळ उसाच्या पिकात पडून आग पेटली. हा प्रकार शेतातील मजुरांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा केला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. गावातील दीडशे दोनशे तरूणांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वेगाच्या वा-याने अडचणी आल्या. अशोक कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. ऊसतोड मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मगर यांनी संतप्त भावना व्यक्त केली.
उसाला लवकर तोड मिळाली असती तर दुर्घटना टळली असती. महावितरण कंपनीनेदेखील घात केला, असे मगर म्हणाले.