चाळीस टक्के रुग्ण नगर शहरातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:44+5:302021-04-01T04:21:44+5:30
(डमी ) अहमदनगर : नगर जिल्ह्यात सध्या सात हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र, त्यातील ४० टक्के रुग्ण नगर ...

चाळीस टक्के रुग्ण नगर शहरातील
(डमी )
अहमदनगर : नगर जिल्ह्यात सध्या सात हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र, त्यातील ४० टक्के रुग्ण नगर शहरातीलच आहेत. याशिवाय बाहेरूनही काही रुग्ण नगर शहरात उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे नगर शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. जिल्ह्यात मात्र अद्याप तरी वैद्यकीय कर्मचारी पुरेसे असून, आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
राज्यासह नगर जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. गेल्या दहा - बारा दिवसांत नगर जिल्ह्यात तब्बल चार हजार रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर कार्यरत करण्यात आली असून, खासगी दवाखान्यांनाही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
नगर जिल्ह्यात सध्या सात हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यातील ४० टक्के रुग्ण नगर शहरातील आहेत. याशिवाय दहा टक्के रुग्ण ग्रामीण भागातून शहरात खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत आहेत. म्हणजे शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या पन्नास टक्के आहे. त्यामुळे नगर शहरात आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून, वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे. शहरातील अनेक कोरोना सेंटर अद्याप बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून, कमी आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना उपचार मिळण्यात उशीर होत आहे.
त्या तुलनेत जिल्ह्यात ६९ टक्के रुग्ण असले तरी हे रुग्ण जिल्हाभर विखुरले आहेत. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणा या रुग्णांसाठी सक्षम आहे. उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी हॉस्पिटल यामध्ये अद्याप तरी पुरेसे आरोग्य कर्मचारी असल्याने यंत्रणेवर ताण आलेला नाही. भविष्यात आणखी रुग्ण वाढले तर कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार त्या-त्या तहसीलदारांना दिलेले आहेत.
----------------
शहरात कोविड केअर सेंटर कमी
नगर शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर उभारली होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही सेंटर बंद करण्यात आली. मात्र, आता नगर शहरातच अडीच ते तीन हजार रुग्ण असल्याने कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे बंद असलेली कोविड सेंटर सुरू करण्याबाबत महापालिका हालचाल करत आहे.
-----------------
सध्या जिल्ह्यात असलेले रुग्ण व कार्यरत असलेली आरोग्य यंत्रणा याचा समतोल साधला आहे. अजून तरी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. यापुढील काळात रुग्णांची संख्या आणखी वाढली तर तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचारी नेमण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची सोय करता येईल.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
-----------------
बरे झालेली रुग्ण संख्या : ८५६५२
उपचार सुरू असलेले रूग्ण : ६३८५
मृत्यू : १२०५
एकूण रूग्ण संख्या : ९३२४२
---------------
सध्या कार्यरत आरोग्य कर्मचारी
जिल्हा परिषद - १३१४
जिल्हा रुग्णालय-ग्रामीण रुग्णालये - १२३३
राष्ट्रीय आरोग्य अभियान - ११००
-----------
डमी फोटो मेलवर