टँकरची बिले देताना ठेकेदाराकडून चाळीस टक्क्यांची कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:24+5:302021-02-26T04:29:24+5:30
जामखेड : २०१९ टंचाई काळात टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालक-मालकांना जामखेड तालुका वीट उत्पादक मोटार वाहतूक ही ठेकेदार संस्था ...

टँकरची बिले देताना ठेकेदाराकडून चाळीस टक्क्यांची कपात
जामखेड : २०१९ टंचाई काळात टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालक-मालकांना जामखेड तालुका वीट उत्पादक मोटार वाहतूक ही ठेकेदार संस्था बिले देताना ४० टक्क्यांची कपात करत आहे. आम्हाला पूर्ण बिले मिळावीत, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पैसे न मिळाल्यास १ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
टँकर चालक-मालक संतोष गव्हाणे, प्रकाश ढवळे, संभाजी बोरूडे, योगेश रेडे यांनी निवेदन दिले. २०१९ टंचाई काळात जामखेड तालुका वीट उत्पादक मोटार वाहतूक संस्थेकडे टँकर भाडेकराराने होते. सरकारी दर प्रति टन २३० रूपये असताना संस्था बिले देताना १४५ रूपये टनाप्रमाणे बिले देत आहेत. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत संस्थेच्या पदाधिकारी व अधिकारी यांना विचारणा केल्यावर तेही अधिकाऱ्यांना टक्केवारी वाटावे लागते. तसेच इतर खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिले कपात करून मिळतील, असे सांगितले. करार करताना नोटरी केली आहे. त्याप्रमाणे कारवाई करू, असे ठेकेदार संस्था म्हणते. ठेकेदार संस्थेने नोटरीची एकही प्रत दिली नाही. त्यामुळे त्यामध्ये काय लिहिले आम्हाला माहीत नाही, असे टँकर चालक-मालक यांचे म्हणणे आहे. नियमानुसार बिले मिळावीत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मार्चपासून उपोषणाला बसणार असल्याचे टँकर चालक-मालक यांनी निवेदनात म्हटले आहे.