मृत समजून माजी मंत्र्याची केली पेन्शन बंद

By Admin | Updated: July 3, 2014 00:58 IST2014-07-03T00:28:39+5:302014-07-03T00:58:01+5:30

संगमनेर : कोषागार कार्यालयाने माजी मंत्री बी. जे. खताळ यांना मयत समजून त्यांची सरकारी पेन्शनच बंद केल्याचा प्रकार घडल्याने प्रशासनाची अवस्था ‘आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं’ अशी झाली आहे.

The former minister's understanding of the dead closed the pension made | मृत समजून माजी मंत्र्याची केली पेन्शन बंद

मृत समजून माजी मंत्र्याची केली पेन्शन बंद

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारच्या कोषागार कार्यालयाने माजी मंत्री बी. जे. खताळ यांना मयत समजून त्यांची माजी विधानसभा सदस्य म्हणून मिळणारी सरकारी पेन्शनच बंद केल्याचा प्रकार घडल्याने प्रशासनाची अवस्था ‘आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं’ अशी झाली आहे.
संगमनेरचे लोकप्रतिनिधी म्हणून १९६२ साली न मागता काँग्रेस पक्षाने दिलेल्या तिकिटावर खताळ निवडून आले. राज्य मंत्रीमंडळात पाटबंधारे खात्याचे मंत्रिपद त्यांना मिळाले. खताळ हे पुढे सहकार, अर्थ, विधी व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, महसूल आदी खात्यांचे मंत्री झाले.
१९८२ पर्यंत ते सत्तेत होते. परंतु १९८५ नंतर त्यांनी स्वत:हून राजकारणातून संन्यास घेतला. तेव्हापासून माजी आमदार म्हणून त्यांना सरकारने पेन्शन सुरू केली. ३२ वर्षांपासून खताळ यांना पेन्शन मिळते.
दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. त्यामुळे डिसेंबर २०१३ मध्ये खताळ यांनी नगरच्या कोषागार (ट्रेझरी) कार्यालयास दाखला देवून पोहच घेतली. मार्च २०१४ पर्यंत पेन्शन नियमीतपणे मिळत होती. पण, एप्रिलपासून पेन्शन मिळाली नाही म्हणून खताळ यांनी संगमनेर स्टेट बँक शाखेत चौकशी केली असता कोषागार (ट्रेझरी) कार्यालयाकडूनच पेन्शन आली नसल्याचे समजले. म्हणून नगरच्या कोषागार कार्यालयास संपर्क साधल्यावर संबंधीत अधिकाऱ्यांनी कुणीतरी ‘अर्चना’ नावाच्या महिलेने फोन करून माझे वडील बी.जे. खताळ हे मयत झाले आहेत, असे कळविल्याने पेन्शन बंद केल्याचे मोघम उत्तर खताळ यांना दिले. हे उत्तर ऐकून खताळ अवाक् झाले.
जीवंत व्यक्तीला मयत दाखवून पेन्शन बंद करणाचा प्रताप कोषागार अधिकाऱ्यांनी केल्याने सरकारी कामाचा कटू अनुभव खताळ यांना आला. (प्रतिनिधी)
३२ वर्षांपासून मिळणारी ही पेन्शन काही विडी कामगार किंवा सरकारी नोकराची नव्हे. तर माजी विधानसभा सदस्य म्हणून मिळते. पेन्शन घेणारे माजी आमदार मयत झाला तर विधानभवनात ठराव होवून सचिव जिल्हाधिकाऱ्यांना कळवितात. परंतू मी जीवंत असताना मयत दाखवून पेन्शन बंद करणे, म्हणजे ‘आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं’ अशी प्रशासनाची स्थिती आहे.
- बी.जे. खताळ, माजीमंत्री.
याप्रकरणात कार्यालयाकडून चूक झाली आहे. खताळ यांची माफी मागितली, त्यांनी मोठ्या मनाने माफही केले आहे. बुधवारी सायंकाळी त्यांचे पेन्शनपत्र मंजूर केले असून गुरुवारी सकाळी त्यांना रक्कम पोहोच केली जाईल.
-विजय कोते, जिल्हा कोषागार अधिकारी.

Web Title: The former minister's understanding of the dead closed the pension made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.