अकोले तालुक्यात फुलली निशिगंधाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:35+5:302021-08-12T04:25:35+5:30
अकोले : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ६० गुंठे, तर आत्माच्या माध्यमातून ३० गुंठे अशी मिळून ९५ गुंठे निशिगंधाची ...

अकोले तालुक्यात फुलली निशिगंधाची शेती
अकोले : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ६० गुंठे, तर आत्माच्या माध्यमातून ३० गुंठे अशी मिळून ९५ गुंठे निशिगंधाची फूलशेती कृषी विभागाच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यात फुलली आहे. शाश्वत बाजारभाव असलेल्या भविष्यात निशिगंध फुलशेतीचे क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे. निशिगंधापासून सुगंधी तेलनिर्मितीचे छोटे युनिट उभारण्याची तयारी धुमाळवाडी येथील शेतकऱ्याने सुरू केली आहे.
तालुक्यात झेंडूची फुलशेती मोठ्या प्रमाणात आहे. पण झेंडूचे बाजारभाव सतत दोलायमान असते. पीक उत्पादन खर्च जास्त येतो व शेतकरी कर्जबाजारी होण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात आल्यावर बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना निशिगंधाचे कंद देण्यात आले. धुमाळवाडी येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम धुमाळ यांनी एक गुंठे निशिगंधाची लागवड केली. त्यांना कोविड काळातही चांगले उत्पन्न मिळाले. याच रोपाच्या मदतीने रोहयोतून आता त्यांनी २५ गुंठे निशिगंधा लागवड केली आहे.
धामणगाव आवारी येथील शेतकरी सखाराम पोखरकर व वाघापूर येथील राजाराम लांडे यांनी प्रत्येकी वीस गुंठे निशिगंधा लागवड केली आहे. तसेच आत्माच्या मदतीने अगस्ती सेंद्रिय शेती परिसर गटातील १५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन गुंठे असे ३० गुंठे क्षेत्र लागवडीसाठी अर्काप्रज्वल व रजनी जातीचे निशिगंधा कंद लागवडीसाठी देण्यात आले आहेत. सहा रुपयांस एक कंद असे प्रत्येक शेतकऱ्याला हजार बाराशे कंद देण्यात आले आहे. निशिगंधाचे तेल बारा हजार रुपये प्रतिकिलो असे बाजारात विकले जाते. तसेच फुलांचे किलोचे बाजार १५० ते १८० रुपयांदरम्यान सतत स्थिर असतात. कमी उत्पादन खर्च आणि किफायतशीर फुलशेती असल्याने तालुक्यात निशिगंधाची शेती वाढेल यात शंका नाही.
.................
अर्काप्रज्वल हा वाण रजनीपेक्षा सरस व वजनदार आहे. एका फुलाचे वजन २.४ ग्रॅम इतके असते. हा वाण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हाॅर्टिकल्चर रिसर्च बेंगलोर येथून कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे प्राप्त झाला. डाॅ. पुरुषोत्तम हेंद्रे यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले. शाश्वत भाव असल्याने निशिगंधाचे क्षेत्र वाढेल.
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी
..............
एक गुंठ्यात चांगले उत्पन्न मिळाले म्हणून २५ गुंठे निशिगंधा लागवड केली आहे. आणखी क्षेत्र यासाठी गुंतवणार आहे. तेल काढण्याचे युनिट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- तुकाराम धुमाळ, प्रयोगशील शेतकरी, धुमाळवाडी
१० निशिगंधा