फुलांचा बाजार कोमेजला, दर १० रुपयांवर गडगडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:53+5:302021-09-12T04:24:53+5:30
सुपा (जि. अहमदनगर) : झेंडूला १० ते १५, शेवंतीला ३० ते ३५ रुपये असा अवघा प्रतिकिलोचा भाव मिळू लागल्याने ...

फुलांचा बाजार कोमेजला, दर १० रुपयांवर गडगडला
सुपा (जि. अहमदनगर) : झेंडूला १० ते १५, शेवंतीला ३० ते ३५ रुपये असा अवघा प्रतिकिलोचा भाव मिळू लागल्याने पारनेर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनामुळे विविध सण साजरे करण्यावर असलेले निर्बंध व गेली काही दिवस सलग राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
गोरेगाव हे गाव फूल शेतीसाठी प्रसिद्ध असून येथे नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी दरवर्षी फुलशेती करतात. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, बोअर यात पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेवंतीची लागवड तर केलीच जोडीला झेंडू, अष्टरचे उत्पन्न घेतले. त्यामुळे गोरेगावच्या शिवारात फुलशेती बहरली.
साधारणपणे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात फुलशेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते. दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या काळातही फुलांची मागणी वाढल्याने हाती चार पैसे येऊन शेतकऱ्यांना देणी, कर्ज, उधार, उसनवारी मिटविण्यासाठी मदत होते. गोरेगावमधून कल्याण-नगर येथील बाजारपेठेत फुले पाठविण्याची व्यवस्था असते. फूल उत्पादनामध्ये नावलौकिक असल्याने अनेक व्यापारी थेट गोरेगावमध्ये येऊन फुले खरेदी करून माल घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांना लगेच त्याचे पैसे मिळतात.
सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा, बंधने आली. त्यामुळे याहीवर्षी गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव साजरा न करण्याचे ठरविले. परिणामी मोठ-मोठ्या गणेशोत्सव मंडळांची फुलांची मागणी रद्द झाली. शेवंतीचा भाग्यश्री वाणाला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असून अष्टर ३० ते ४० रुपये किलोने विकले जात आहे, असे फूल उत्पादक व व्यावसायिक आप्पासाहेब नरसाळे यांनी सांगितले.
झेंडूचा भावही घसरला असून १० ते १५ रुपये किलो दर मिळत आहे. ज्यांनी झेंडूची जास्तीची लागवड केली त्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. गोरेगावमधून दररोज १० ते १५ वाहने भरून फुले वेगवेगळ्या मार्केटमध्ये रवाना होत असल्याचे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
---
उत्पादन अन् खर्चाचा ताळमेळ बसेना..
सध्या पावसाच्या सरी अधूनमधून येत असल्याने फुले भिजतात व खराब होतात, अशी फुले फेकून द्यावी लागतात. जमीन मशागत, बियाणे, लागवड, पाणी देणे, तोडण्यासाठी साधारणपणे प्रति मजूर २५० ते ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला अन् उत्पन्न घटले अशी स्थिती आहे.
---
फूल शेतीलाही हमीभाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव ठरवून त्याच भावाने शेतमालाची खरेदी केली तर शेतकऱ्यांची वाताहत थांबेल.
-अभयसिंह नांगरे, माजी उपसरपंच, गोरेगाव
-----
११ गोरेगाव फुले
गोरेगाव येथील शेतकऱ्यांची फुले बाजारात पाठविण्यासाठी चाललेली लगबग.