पाचपुतेंचा वाकचौरे करु!

By Admin | Updated: August 19, 2014 23:27 IST2014-08-19T23:08:35+5:302014-08-19T23:27:10+5:30

पाचपुतेंना भाजपाने उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा ‘वाकचौरे’ करू’ असा इशारा नगर तालुका शिवसेनेने आज पत्रकार परिषदेत दिला.

Fivepoot! | पाचपुतेंचा वाकचौरे करु!

पाचपुतेंचा वाकचौरे करु!

अहमदनगर : आ.बबनराव पाचपुते यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाला विरोध करून ‘जे दिंडीत जाऊन राजकीय सोयीनुसार पांडुरंग बदलतात त्यांच्यावर आता कोण विश्वास ठेवणार? शिवसेनेचा विरोध झुगारून पाचपुतेंना भाजपाने उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा ‘वाकचौरे’ करू’ असा इशारा नगर तालुका शिवसेनेने आज पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी बोलताना नगर तालुका प्रमुख संदेश कार्ले, उपतालुका प्रमुख शंकर ढगे म्हणाले की, आम्ही गेली पाच वर्षे पाचपुतेंच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेतली. पाण्याचे टँकर, साकळाई योजना, जनावरांच्या छावण्या यासाठी पाचपुतेंच्या विरोधात शिवसेनेने राजकीय संघर्ष केला. आज त्याच पाचपुतेंसाठी आम्ही मतदारांसमोर गेलो तर आम्हाला वेड्यात काढतील. असे सांगून कार्ले म्हणाले की, जे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपले पांडुरंग मानायचे त्यांनाच त्यांनी फसवले.
तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना व सामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था होईल? जे सोयीनुसार ‘पांडुरंग’ बदलतात त्यांच्यावर कोण विश्वास दाखवणार? असा प्रश्न उपस्थित करून कार्ले म्हणाल की, माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी पाचपुतेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांनी श्रीगोंद्यात सहकार मोडून खासगी कारखाने काढले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकवले, ज्यांच्या कारखान्याऐवजी घरांवर मोर्चे निघतात अशांबरोबर घेऊन आम्ही लोकांपुढे जायचे का?, हे ठरविण्याची वेळ आली आहे.
( प्रतिनिधी)
भाजपाची भूमिका गुलदस्त्यात; सेना तोंडघशी
पत्रकार परिषदेत नगर तालुका शिवसेनेसोबत भाजपाही आपली भूमिका संयुक्तपणे मांडणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी फक्त नगर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित राहिले. यामुळे नगर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांची व आ.शिवाजी कर्डिले यांची भूमिका गुलदस्त्यातच राहिली.
भाजपा-शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद असल्याचे निरोप माध्यमांना देण्यात आले. मात्र ऐनवेळी भाजपाने ‘कल्टी’ मारल्याने नगर तालुका शिवसेना तोंडघशी पडली. पाचपुतेंच्या प्रवेशास विरोध करण्याची भूमिका घेऊन सेना पदाधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख धनंजय गाडे, जि.प. सदस्य दत्तात्रय सदाफुले, पंचायत समिती सदस्य पोपट निमसे, विभाग प्रमुख अजय बोरूडे, माजी तालुका प्रमुख रामदास भोर, युवा नेते योगीराज गाडे, दिलीप शिंदे, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Fivepoot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.