‘पूर्णवाद’ लावणार पाच हजार झाडे
By Admin | Updated: July 11, 2016 00:57 IST2016-07-11T00:40:22+5:302016-07-11T00:57:43+5:30
अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

‘पूर्णवाद’ लावणार पाच हजार झाडे
अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातून झाडे मागविण्यात आली आहेत. याच दिवशी वृक्षदिंडी, वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी शिष्य परिवाराला यंदा झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकॅडमीने झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. याच अॅकॅडमीने दोन महिन्यापूर्वी पारनेरला पर्यावरण परिषद आयोजित केली होती. गुरुपौर्णिमा ही वृक्षपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील पूर्णवाद परिवारातील दोन हजार तरुण पारनेरमध्ये झाडे लावण्यासाठी दाखल होणार आहेत. पूर्णवाद परिवाराच्या सर्व मंदिरांमध्येही गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाडे लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रमुख सोहळा १९ जुलै रोजी पारनेरमध्ये होणार असल्याची माहिती अॅकॅडमीचे अध्यक्ष राहुल संत यांनी दिली. १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पारनेर पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार, योगासन मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी माजी सैनिक दथरथ बोरुडे, गीताराम म्हस्के, अॅड. अमित देशपांडे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास उढाण, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, प्राचार्य एच. पी. गोडळकर यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात येईल. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत म्हस्के, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, विवेक देशपांडे, लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन गौरव पुरंदरे, सुरेंद्र रोडगे, स्वप्नील जहागीरदार, गणेश संत, मंगेश मोहिते आदींनी केले आहे.
पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दुष्काळ आणि पाण्याची घटलेली जलपातळी या पार्श्वभूमीवर राज्यभरात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पारनेर तालुक्यात वर्षभरात ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यातील पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन १९ जुलै रोजी करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या ‘माय सिटी-माय ट्री’अभियानामुळे झाडे लावण्याबाबत जागृती वाढली आहे.
-अॅड. राहुल संत, आयोजक