सप्तपदी अभियानांतर्गत शेतातील पाच रस्ते खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:06+5:302021-03-06T04:20:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात महसूल विजय सप्तपदी अभियानांतर्गत दिनांक ७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ...

सप्तपदी अभियानांतर्गत शेतातील पाच रस्ते खुले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात महसूल विजय सप्तपदी अभियानांतर्गत दिनांक ७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पाच गावांमधील पाच शेतरस्ते दळणवळणासाठी खुले करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यात प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ७ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे विविध दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्यासंदर्भात राज्यात त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात ‘महाराजस्व अभियान’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील पाच गावांमधील शेतातील पाच रस्ते दळणवळणासाठी खुले करण्यात आले. त्यामध्ये मल्हारवाडी व सुरेगाव या गावातील प्रत्येकी अर्धा किलोमीटर तर रवंदा व पढेगाव येथील प्रत्येकी एक किलोमीटर तसेच बहाद्दरपूर येथील दोन किलोमीटर असे एकूण पाच किलोमीटरचे रस्ते मोकळे केले आहेत. तसेच या अभियानांतर्गत मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार २७ व नकाशावरील रस्ते मोकळे करणे २६ अशी एकूण ५३ प्रकरणे, पोटखराबा लागवडीखाली आणावे यासाठीची सुमारे ४०३ प्रकरणे, स्मशानभूमी व दफनभूमीची १५ प्रकरणे महसूल विभागाकडे प्राप्त झाली आहेत. तसेच महाआवास योजेनेंतर्गत घरकुलांचे १५६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तुकडेजोड - तुकडेबंदीची एकूण २८ प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यापोटी १६ लाख २० हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे. तीन खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे.
..........
या अभियानांतर्गत प्राप्त प्रकरणांपैकी पाच गावातील पाच रस्ते वहिवाटीसाठी खुले केले आहेत. उर्वरित रस्ते ३१ मार्चपर्यंत खुले करण्यात येणार आहेत.
- योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव