पारनेर तालुक्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:43+5:302021-04-30T04:25:43+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील पाच दिवसांसाठी तालुक्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय ...

पारनेर तालुक्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन
सुपा : पारनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील पाच दिवसांसाठी तालुक्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी जाहीर केला. घराबाहेर पडणारांना एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यात कंपनीतील कामगारांचाही समावेश असेल, असे म्हटल्याने सुपा एमआयडीसील उद्योगांपुढे पेच निर्माण झाला आहे.
बोटावर मोजता येईल इतक्याच कारखान्यात आतमध्ये कामगारांच्या निवासाची सुविधा आहे. बाकी सर्व छोट्या-मोठ्या उद्योगातील व कारखान्यातील कामगार हे परिसरातील गावातून सुप्यातून कामावर येतात. बरेचसे कामगार दुचाकीवरून तर काही पायी कामावर जाणारेही आहेत. बहुतांश कामगार ठेकेदाराकडे काम करतात. त्यामुळे ते कंपनीत कामाला असले तरी त्यांना ऑन रोलवर काम करणाऱ्या कामगाराप्रमाणे सुविधा नाहीत. त्यामुळे या कामगारांना कामावर जाण्यासाठी प्रतिबंध केला तर कारखान्यांची घरघर बंद होण्यास वेळ लागणार नाही व एमआयडीसी बंद पडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे कारखान्याच्या व्यवस्थापक व प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
बस सुविधा असेल तरच कामगारांना कामावर बोलवता येईल, अशी चर्चा असली तरी अगदीच कमी लोक तेही वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतील तर बस सुविधा पुरवणे खर्चिक व अवाजवी असून, त्यामुळे आमच्या अत्यावश्यक फूड निर्मिती केंद्राची उत्पादन प्रक्रिया बंद पडेल, अशी भीती शंकेश्वर आटा मिलचे व्यवस्थापक सुभाष नगरे यांनी व्यक्त केली. आमचा प्लॅन्ट सध्या आम्ही बंद ठेवला असून, काही महत्त्वाच्या कामासाठी, मेंटन्सकरिता किरकोळ कामगार कामावर येतात, असा बंदचा निर्णय झाला तर तेही काम बंद पडेल, अशी भीती कॅरिअर मायडियाचे व्यवस्थापक पंकज यादव यांनी व्यक्त केली. कारखान्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व आस्थापना खबरदारीच्या उपयोजना करतात, त्यामुळेच तर कामगार घरी बसण्यापेक्षा कामावर येण्याला पसंती देत असल्याचे मिंडाचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे यांनी सांगितले.
सध्या प्रत्येक कामगाराला आपल्या जीविताची काळजी आहे व शक्य तो सर्व नियमांचे पालन करण्यात येत असल्याने एमआयडीसीतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सुपा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी सांगितले.
---
शासनाच्या गाडलाइन इंडस्ट्री चालू ठेवायच्या आहेत. त्यासाठी असणारे नियम पाळले पाहिजेत. ते नियम पाळतील त्या इंडस्ट्री बंद करता येणार नाहीत.
-नितीन गवळी,
क्षेत्रीय व्यवस्थापक, एमआयडीसी, नाशिक.
---
कारखाने बंद करायचे नाहीत. कारखान्यात कामासाठी अप-डाउन करणाऱ्यांची लिस्ट पोलिसांकडे व तहसीलदार यांच्याकडे द्यावयाची आहे.
- सुधाकर भोसले,
उपविभागीय अधिकारी.
----
कंपनीत राहण्याची सोय असेल तर संसर्गाचा धोका कमी होईल. तरी कारखान्यात काम करताना नियम पाळले पाहिजेत. आपल्याला स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे कामगारांना अडवणार नाही. कामगारांसाठी बसेसची व्यवस्था करायला हवी.
-नितीनकुमार गोकावे,
पोलीस निरीक्षक, सुपा.