चांदेगाव रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:56+5:302021-05-04T04:09:56+5:30
श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रामपूर, कोल्हार ते आंबी, दवणगाव, चांदेगाव या सुमारे १७ किलोमीटर ...

चांदेगाव रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रामपूर, कोल्हार ते आंबी, दवणगाव, चांदेगाव या सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील ३२ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आ. लहू कानडे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय व हाल होत होते. आ. कानडे त्यासाठी प्रयत्नशील होते. त्यास यश मिळून रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे पत्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच आ. लहू कानडे यांना पाठविले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट राहुरी तालुक्यातील ३२ गावांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता आहे. विशेषतः शेतकरीवर्गाची डोकेदुखी त्यामुळे दूर होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवासासाठी हाल होत होते. केंद्रीय रस्ते दुरुस्ती (सीआयआरएफ) अंतर्गत रस्ता मंजूर झाला असून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. लवकरच या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. बाभळेश्वर ते नेवासा फाटा तसेच श्रीरामपूर ते बेलापूर या काही प्रमुख मार्गांच्या कामांनाही यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.