केडगावच्या पेट्रोल पंपावर गोळीबार
By Admin | Updated: July 21, 2014 00:30 IST2014-07-20T23:59:03+5:302014-07-21T00:30:12+5:30
अहमदनगर : केडगाव येथील पेट्रोल पंपावर कारमध्ये डिझेल भरून पैसे न देता बंदुकीचा धाक दाखवून, पेट्रोल पंपावर गोळीबार करून चौघांनी दहशत माजविली.
केडगावच्या पेट्रोल पंपावर गोळीबार
अहमदनगर : केडगाव येथील पेट्रोल पंपावर कारमध्ये डिझेल भरून पैसे न देता बंदुकीचा धाक दाखवून, पेट्रोल पंपावर गोळीबार करून चौघांनी दहशत माजविली. गोळीबार करून चौघांनी पुण्याच्या दिशेने धूम ठोकली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पेट्रोल पंपाचे मालक तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व त्यांच्या मित्रांचे प्रसंगावधान, वेळीच धावून आलेले पोलीस यांच्यामुळे चार तासांमध्येच चारही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. आरोपींकडून सात जिवंत काडतुसे व ३ गावठी कट्टे आणि कार (क्ऱ एम.पी.०७, सीबी ३९९०) असा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गोळीबाराच्या या घटनेनंतर नितीन याने साथीदारांना गोळा केले, तर एकाने महामार्ग पोलीस चौकीत जाऊन घटना सांगितली. तेथील कर्मचारी ढगे यांनी सुपा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पंपाचे मालक सचिन जगताप हेही तातडीने दाखल झाले. त्यांनी तातडीने त्यांचे मित्र स्वप्नील घुगे यांना मोबाईलवर संपर्क साधून सुपा टोल नाका येथे थांबण्यास सांगितले. स्वप्नील व त्यांच्या २० ते २५ मित्रांनी पुण्याकडे जाणाऱ्या स्वीफ्ट गाड्यांची तपासणी केली. त्यावेळी एका गाडीत त्यांना संशयित आढळले. त्यांनी अधिक तपासणी केली असता गाडीतील मागच्या सीटखाली दोन गावठी पिस्तूल आढळून आले. पुण्याच्या दिशेने पळ काढणाऱ्यांना पेट्रोलिंग करीत असलेले सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खरमाटे यांनी तरुणांच्या सहाय्याने शिताफीने सुपा टोल नाक्यावर पकडले. पोलिसांनी लगेच त्यांना सुपा पोलीस ठाण्यात आणले. सरुपाल साम्रीसिंग राजपूत, अमीर सलीम खान, शिव भगवानदास शर्मा, कृपाल गुज्जर (सर्व रा. आलमूर, मध्यप्रदेश) अशी चार आरोपींची नावे आहेत. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फौजदार खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.
अशी घडली घटना
नगर-पुणे रोडवर हॉटेल अर्चना शेजारील जगताप यांच्या पेट्रोल पंपावर रात्री १२.३० च्या सुमारास एका गाडीतील चौघांनी अडीच हजार रुपयांचे डिझेल भरले. गाडीतील चालकाने पेट्रोल पंपावरील कर्मचारी नितीन
भोसले याला डिझेल भरण्यास सांगितले. डिझेल भरून झाल्यानंतर चालकाने नितीन यास गाडीच्या दुसऱ्या बाजूने जा असे सांगितले. नितीन जेंव्हा गाडीच्या दुसऱ्या बाजूने दरवाजाजवळ गेला तेंव्हा गाडीतील एका तरुणाने नितीन यास पिस्तूल दाखवून ढकलून दिले अन् गोळीबार करून पुण्याच्या दिशेने पळ काढला.