अखेर काष्टीतील जनावरांचा बाजार पुन्हा सुुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:17+5:302021-09-05T04:25:17+5:30
काष्टी : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद झाले. गेल्या दीड वर्षांपासून हे बाजार बंद होते. दुसऱ्या लाटेपूर्वी ...

अखेर काष्टीतील जनावरांचा बाजार पुन्हा सुुरू
काष्टी : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद झाले. गेल्या दीड वर्षांपासून हे बाजार बंद होते. दुसऱ्या लाटेपूर्वी काष्टीतील जनावरांचा बाजार सुरू झाला होता. मात्र, हा बाजार दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद झाला. आता हा बाजार पुन्हा सुरू झाला असून, शनिवारी काष्टीच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.
काष्टी येथील शनिवारचा आठवडे बाजार पाच महिन्यांनंतर प्रथमच भरला. या पहिल्याच बाजारात मागील तुलनेत ५० टक्के गायी, म्हैस, बैलांची आवक झाली. आवक कमी असूनही जनावरांना चांगल्या किमती मिळाल्या. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे शेतकरी, पशुपालकांचा उत्साह दुणावलेला दिसला. ओस पडलेली काष्टीची बाजारपेठ पुन्हा फुलून गेली.
काष्टीच्या आठवडे बाजारात सुमारे दहा हजार जनावरांची आवक होते. जनावरे खरेदी - विक्री करण्यासाठी नगर, पुणे, बीड, सोलापूरमधील शेतकरी आणि गुजरात, मुंबई, तेलंगणा, कर्नाटकमधील व्यापारी येतात. आठवडे बाजार बंद असल्याने शेतकरी, व्यापारी याबरोबर श्रीगोंदा बाजार समितीचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा बाजार सुरू झाल्याने काष्टीत चैतन्याची झलक पाहायला मिळाली.
...............
काष्टीचा आठवडे बाजार सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
-सुनील पाचपुते, उपसरपंच, काष्टी.
............
काष्टीचा आठवडे बाजार पाच महिने बंद राहिल्याने बाजार समितीचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या बाजारात आणखी सुविधा देणार आहे.
-दिलीप डेबरे, सचिव, बाजार समिती श्रीगोंदा.
.......
फोटो