हक्काच्या पाण्यासाठी मागणी अर्ज भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:00+5:302021-06-09T04:26:00+5:30
श्रीगोंदा : कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी ...

हक्काच्या पाण्यासाठी मागणी अर्ज भरा
श्रीगोंदा : कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा, पाणी प्रश्नी कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समिती सदस्य घनशाम शेलार यांनी दिला आहे.
याबाबत शेलार यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. भीमा उप खोऱ्यातील जलसंपदा प्रकल्पांचे पुनर्विलोकन व पुनर्नियोजन करण्याकरिता शासनाने जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली २० मे २०२१ रोजी समिती स्थापन केली आहे. ही समिती भीमा उप खोऱ्यातील धरणांचा व लाभक्षेत्रातील विविध बाबींचा अभ्यास करणार आहे
त्यात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ‘बदलता पाणी वापर व वास्तववादी सिंचन क्षमता’ या बाबींवर अभ्यास होणार असून समिती हा अहवाल तीन महिन्यात शासनास सादर करणार आहे.
आपल्या लाभक्षेत्रात पाणी मागणी कमी आहे व या भागातून अपेक्षित महसूल मिळत नाही हे समितीच्या निदर्शनास आल्यास या भागात पाणी मागणी नाही म्हणून आपल्या वाट्याचे पाणी जाऊ शकते. असे घडल्यास आपले कधीही न भरून येणारे नुकसान होणार असून भावी पिढी आपणाला कधीही माफ करणार नाही. याचा गांभीर्याने विचार होणे नितांत गरजेचे आहे.
त्यामुळे सध्या असणाऱ्या पाणी वापराची व त्या अनुषंगिक पाणी मागणी अर्जाची नोंद जलसंपदा विभागाचे दप्तरी असणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी भरलेली असणे गरजेचे आहे.
त्याकरिता लाभक्षेत्रातील सर्वच सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन जागृती करावी तरच आपल्या हक्काचे पाणी अबाधित राहील तरी याबाबतचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेऊन शेतकरी व पाणी वापर संस्थांनी सतर्क होणे गरजेचे असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.