दशक्रियाविधीत कुत्र्यांचा पंधरा जणांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 07:57 IST2024-02-08T07:56:55+5:302024-02-08T07:57:43+5:30
प्रथमोपचारानंतर हलविले अहमदनगरला

दशक्रियाविधीत कुत्र्यांचा पंधरा जणांवर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खोकर येथील सिन्नरकर वस्ती भागात दशक्रियाविधी सुरू असताना त्यामध्ये मोकाट कुत्रे घुसले आणि त्यांनी दहा ते पंधरा जणांना चावा घेतला. त्यामुळे मोठी धांदल उडाली. जखमींवर नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली.
या घटनेत जेऊर येथून आलेल्या नीलेश रामचंद्र भोंदे (वय ३७), मीरा दिलीप गिते (वय ५५), वळदगाव येथील सागर माळी (वय ३२), खोकर येथील चंद्रकला दिलीप चव्हाण यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली. वडाळा महादेव येथे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या हुसेन चांदशहा पठाण यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला. याच ठिकाणी दत्तू पगारे यांच्या तोंडाला कुत्र्याने चावा घेत जखमी केले. पगारे यांच्या दोन मुलांनाही कुत्र्याने चावा घेतला. सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर नगरला हलविले.