अहमदनगर : जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना मागील उसाचे पेमेंट दिले नाही. त्यामुळे जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत कारखान्यांना गाळपासाठी परवानगी देऊ नये, अशी भूमिका प्रहार जनशक्ती संघटनेने घेतली असून, त्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या ऊस भावाची रक्कम मिळण्यासाठी प्रहार संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. थकीत रक्कम असलेल्या कारखान्यांना परवानगी देऊ नये, जे कारखाने रीतसर भाव आणि वेळेवर पैसे देतील त्यांना ऊस द्यावा, कारखान्यांचे वजन काटे निरीक्षण करताना निरीक्षण पथकाबरोबर शेतकरी प्रतिनिधी असावा, कारखान्यांनी हंगाम सुरू होण्याअगोदर उसाचा भाव जाहीर करावा, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कडक निकष लावण्यात यावेत, ऊस कारखान्याला, तर वाढे शेतकऱ्यांना द्यावेत, कारखान्यांनी अगोदर आपल्या गटातील ऊस न्यावा, नंतर इतर उसाला प्राधान्य द्यावे, शेतकरीनिहाय यादी आयुक्त कार्यालयाला सादर करावी, कारखान्यांच्या ऊस भावात तफावत नसावी, ऊस तोडीची कार्यवाही जशा नोंदी आल्यात तशीच व्हावी, अशा अनेक मागण्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालकांकडे मांडल्या. मात्र, त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत दोषी कारखान्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, सल्लागार मालोजी शिकारे, शेवगाव तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, भीमराव पाटील, बंडू उगले आदी उपस्थित होते. -----------------
फोटो मेल प्रहार संघटना
शेतकऱ्यांना उसाचे थकीत पेमेंट मिळावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.