खते महागली, महागाईची शेतकऱ्यांना झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:52+5:302021-03-10T04:20:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने रासायनिक खते महागली आहेत. सध्या कांदा व इतर धान्यांसह भाजीपाल्याचे ...

खते महागली, महागाईची शेतकऱ्यांना झळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने रासायनिक खते महागली आहेत. सध्या कांदा व इतर धान्यांसह भाजीपाल्याचे भाव कोसळले आहेत. इंधन दरवाढीने शेतीची मशागतीचे कामेही महागली आहेत. मजुरीही वाढली आहे. यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
डीएपी बरोबरच सर्व खतांच्या दरात प्रति बॅग मागे थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. अगोदरच अतिवृष्टी, कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा जास्तीच्या आर्थिक संकटात लोटला गेला आहे. पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे. आठवडे बाजार बंद होत असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. भाजीपाला कसा विकावा असा प्रश्नही शेतकरी वर्गासमोर आहे. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
मागील हंगामात कोरोना, अतिवृष्टी व परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला होता. त्यातून कसाबसा सावरणार तोच पुन्हा इंधन व खत दरवाढीचा सामना करावा लागत आहे. त्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनजीवनावर परिणाम होत आहे.
साधारण एप्रिल महिन्यात मशागतीची कामे सुरु होतात. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरण पाळी, रोटाव्हेटर, शेतात शेण खत टाकणे यासारखे अनेक मशागतीची कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. इंधनाचे दर वाढल्याने मशागत महागली आहे.
-------- --
अगोदरच शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे, त्यात मजूर ही मिळत नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची ट्रॅक्टर साहाय्याने विविध कामे करावी लागतात. इंधनाचे दर वाढल्याने मशागत महागली आहे, आता खताचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे शेती न परवडणारी झाली आहे.
-विष्णू मुटकुळे, शेतकरी.
--------
मोठ्या प्रमाणात खर्च करुन पिकविलेला शेतीमाल लॉकडाऊन दरम्यान बांधावर टाकून देण्याची वेळ आली, त्यानंतर अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. वाढलेल्या इंधन व खतांच्या किमती यामुळे महागाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांचा उत्पादन खर्च सुमारे २५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
-बाळासाहेब फटांगडे, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना.