जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 20:04 IST2017-09-09T20:04:07+5:302017-09-09T20:04:17+5:30
कोपरगाव : शेत जमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या मुलांनी आपल्या जन्मदात्या पित्याचाच खून केल्याची घटना तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे घडली. ...

जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
कोपरगाव : शेत जमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या मुलांनी आपल्या जन्मदात्या पित्याचाच खून केल्याची घटना तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे घडली. मयताचे नाव फकिरा लहु रणधीर (वय ७०) असे आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फकिरा रणधीर हे शेतकरी खालकर वस्ती, काकडी रोड येथे सहकुटूंब राहतात. त्यांना तीन मुले व दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेत जमिनीच्या वाटपावरून मुले मधुकर फकीरा रणधीर (वय ४०) व विकास फकिरा रणधीर (वय २७) यांचे वडील फकिरा रणधीर यांच्याशी वाद सुरू होते. वडील सदर जमीन बहिणींच्या नावावर करणार असल्याची कुणकुण दोघांना लागली. दरम्यान शुक्रवारी रात्री मधुकर व विकास यांनी फकिरा यांना काठीने बेदम मारहाण करीत गळा दाबून खून केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शिर्डी पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.
मयत फकिरा रणधीर यांचा मृतदेह लोणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मधुकर व विकास यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे भेट देवून पाहणी केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.