वडिलाने केला मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:46+5:302021-04-02T04:21:46+5:30
कोपरगाव : तालुक्यातील एका गावात दारुड्या वडिलाने घरात झोपलेल्या पोटच्या अल्पवयीन पोरीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ...

वडिलाने केला मुलीचा विनयभंग
कोपरगाव : तालुक्यातील एका गावात दारुड्या वडिलाने घरात झोपलेल्या पोटच्या अल्पवयीन पोरीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २३ फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारस घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दारुड्या वडिलाविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. १ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पीडितेची आई दारुड्या नवऱ्याच्या छळाला कंटाळून पाच वर्षांपूर्वीच घर सोडून माहेरी निघून गेली आहे. त्यामुळे आपल्या आजी, आजोबा, बाप, एक बहीण व पीडिता एकत्र राहतात. २३ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता पीडिता जेवण करून झोपलेली होती. त्यावर वडील दारू पिऊन आले. त्याने मुलीस हात पाय दाबण्यास सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने तिचा विनयभंग केला. झाल्या प्रकाराविषयी आरडाओरडा केल्यास, कुणास काही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. पीडितेने झालेला प्रकार दुसऱ्या दिवशी माहेरी असलेल्या आपल्या आईस फोनद्वारे कळविला.
........
टपालाद्वारे फिर्याद
मुलीने फोन करून झालेला प्रकार सांगितल्यानंतर आईने माहेरहून टपालाद्वारे पीडितेच्या वडिलाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गुरुवारी (दि. १ एप्रिल ) पीडितेच्या राहत्या घरी जाऊन चौकशी करून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस तत्काळ अटक केली आहे.