कर्जत : शेतकऱ्यांनी आधुनिक शेती बरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीकडे लक्ष केंद्रित करावे. कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले.
कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत मांदळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राज्य सरकारच्या वतीने सध्या राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम हे अभियान राबविण्यात येत आहे. ही मोहिमेंतर्गत १ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील राशीन, कर्जत, मिरजगाव, कुळधरण या चार मंडलात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जाऊन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत. मिरजगाव मंडलात मिरजगाव, मांदळी, कोकणगाव, नागमठाण या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रूंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, खतांचा संतुलित वापर, एक गाव एक वान, ऊस लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, पिकांवरील कीड व रोग नियंत्रण याबाबत उपाययोजना आदी विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.