शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:56+5:302021-07-09T04:14:56+5:30

शेवगाव : तालुक्यात अवघा पंधरा टक्के पाऊस झाला असून त्यावरच अवघ्या ५१ टक्के पेरण्या झाल्या. काही ठिकाणी पिकांची उगवण ...

Farmers in Shevgaon taluka hope for rain | शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची आस

शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची आस

शेवगाव : तालुक्यात अवघा पंधरा टक्के पाऊस झाला असून त्यावरच अवघ्या ५१ टक्के पेरण्या झाल्या. काही ठिकाणी पिकांची उगवण झाली तर काही ठिकाणी पिके उगवण झालेली नाही. त्यातच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट आहे. पाऊस नसल्याने उर्वरित पेरण्याही खोळंबल्या आहेत.

जूनच्या सुरुवातीस काही दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. नंतरच्या काळात मात्र एक दिवसाआड पाऊस झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यातच वातावरणात असह्य उकाडा वाढला आहे. रात्रीच्यावेळी ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत तालुक्यातील ५६ हजार २७२ हेक्टर क्षेत्रापैकी २८ हजार ९६५ हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. त्यात १७ हजार १५३ हेक्‍टरवर कपाशीची सर्वाधिक लागवड झाली. इतर पिकांमध्ये बाजरी २ हजार ६० हेक्टर, मका ७० हेक्टर, मूग ५९७ हेक्टर, उडीद ४९३ हेक्टर, तूर ५ हजार ३७७ हेक्टर, सोयाबीन ४३१ हेक्टर आदींचा समावेश आहे.

सहा महसूल मंडळांपैकी सर्वात कमी ढोरजळगाव मंडळात केवळ १७ टक्के तर भातकूडगाव मंडळात २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत ओल असल्याने पेरलेली पिके उगवत आहेत. मात्र वाढ कमी प्रमाणात आहे. येत्या एक-दोन दिवसात दमदार पाऊस झाल्यास पिकांची उगवण चांगली होईल. तसेच खोळंबलेल्या पेरण्या होतील, अशी परिस्थिती आहे. बागायतदार विहिरीतून पाणी पिकांना देऊ शकतात. मात्र ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे ते तर पावसावरच अवलंबून आहेत. पाऊस आता झाला नाही तर दुबार पेरण्यांचे संकट आहे. दुबार पेरणीच्या वेळी बियाण्यांची कमतरता जाणवून बियाण्यांच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

----

मंडळनिहाय पाऊस (मि.मी.)

ढोरजळगाव १०९, भातकुडगाव १७०, एरंडगाव १५६, चापडगाव १६४, शेवगाव १९३, बोधेगाव १९४.

---

तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी ५१ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने उर्वरित पेरण्या खोळंबल्या आहेत. कपाशी वगळता अन्य पिकांसाठी सद्य: परिस्थितीत पावसाची आवश्यकता आहे. पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

-किरण मोरे,

तालुका कृषी अधिकारी, शेवगाव

Web Title: Farmers in Shevgaon taluka hope for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.