विखे पाटलांच्या नावाने राज्यात ‘शेतकरी दिन’
By Admin | Updated: August 26, 2014 23:21 IST2014-08-26T23:04:56+5:302014-08-26T23:21:27+5:30
सुधीर लंके, अहमदनगर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून २९ आॅगस्टला ‘शेतकरी दिन’ साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विखे पाटलांच्या नावाने राज्यात ‘शेतकरी दिन’
सुधीर लंके, अहमदनगर
राज्यात महिला, कामगार, अपंग अशा सर्व घटकांचा आदर करण्यासाठी ‘विशेष दिन’ साजरे केले जातात. मात्र राज्यातील जनतेला धान्य, फळे, भाजीपाला पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने मात्र काहीही दिवस साजरा केला जात नाही. त्यामुळे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांंचे आजोबा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून २९ आॅगस्टला ‘शेतकरी दिन’ साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्याच वर्षी या कार्यक्रमासाठी ४ कोटी ४४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी १ जुलैला राज्यात ‘कृषी दिन’ साजरा होतो. आता विखे पाटील यांच्या जयंतीदिनी ‘शेतकरी दिन’ही साजरा होणार आहे. यासंदर्भातील आदेश कृषी विभागाने नुकताच काढला असून शेतकऱ्यांसाठी एकही दिवस नसल्याने हा दिवस सुरु करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे. येत्या २९ आॅगस्टला हा दिवस कसा साजरा करावयाचा याबाबतच्या सूचना कृषी आयुक्तालयाने सर्व कृषी कार्यालयांना पाठविल्या आहेत.
विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे १९५० साली सुरु केला. शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक उंची वाढविण्यासाठी विखे पाटील यांनी भरीव कार्य केले. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री देऊन गौरविले तर शेतकऱ्यांबद्दलच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राहुरी कृषी विद्यापीठाने डॉक्टरेटही बहाल केलेली आहे. त्यांच्या या भरीव कार्याचे स्मरण व्हावे यासाठी हा दिन सुरु करण्यात येत असल्याची शासनाची भूमिका आहे.
हा दिवस साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत ते राज्यस्तर अशा प्रत्येक टप्प्यावर निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
कार्यक्रमासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला दीड हजार रुपये, तालुकास्तरावर अडीच हजार, जिल्हास्तरावर पाच हजार तर राज्यस्तरावर प्रचार, प्रसिद्धीसाठी १५ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. यावर्षी राज्यातील २७ हजार ९०६ ग्रामपंचायती, ३५६ तालुके व ३३ जिल्हे मिळून ४ कोटी ४४ लाख रुपयांचे ‘बजेट’ या दिवसासाठी देण्यात आले आहे. या निधीतून कार्यक्रमांचे आयोजन करुन त्याचा कार्यवाही अहवाल कृषी आयुक्तालयाने तातडीने मागविला आहे.
शेतकऱ्यांसाठी व्याख्याने, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार, कृषी प्रदर्शन असे उपक्रम राबविण्यास सांगण्यात आले आहे.