कोरडवाहू भागातील शेतकऱ्याने उभारला निंबोळी खत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:22+5:302021-02-05T06:30:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या कोरडवाहू भागातील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतीला निंबोळी खत प्रकल्पाची ...

Farmers in arid areas set up neem fertilizer project | कोरडवाहू भागातील शेतकऱ्याने उभारला निंबोळी खत प्रकल्प

कोरडवाहू भागातील शेतकऱ्याने उभारला निंबोळी खत प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या कोरडवाहू भागातील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतीला निंबोळी खत प्रकल्पाची जोड दिली आहे. यातून होणाऱ्या खत निर्मितीतून साधारणतः वार्षिक ५ ते ६ लाखांच्या उत्पन्नाची किमया या शेतकऱ्याने साधली आहे. शेतकरी सालाबादप्रमाणे कपाशी, तूर, ज्वारी, बाजरी, गहू आदी पिकांना प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत येथील प्रगतशील शेतकरी संजय अर्जुनराव बनसोडे (वय ४७) यांनी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करत पारंपरिक पिकांना फाटा देऊन सीताफळ, आंबा, पपई, टरबूज, भाजीपाला आदींची लागवड केली. हे करत असताना रासायनिक खतांऐवजी निंबोळी खताने भाजीपाला, फळबाग, फूलबाग व वेलवर्गीय पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गरजेचे असून, यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो. ही बाब लक्षात येताच बनसोडे यांनी शेतातच पाच वर्षांपूर्वी सुरुवातीला प्रतिदिन २ ते ४ टन क्षमतेचा निंबोळी खत प्रकल्प उभारला. याद्वारे दर्जेदार व चांगल्या प्रतीचे खत तयार करून अहमदनगरमधील तिसगाव, नेवासा, श्रीरामपूर आदींसह औरंगाबाद, जालना जिल्ह्यात खतांचा पुरवठा केला. बाजारपेठेत या खताची मागणी वाढल्याने त्यांनी नुकत्याच प्रतिदिन १० टन क्षमतेच्या आधुनिक मशिनरीची त्यास जोड दिली आहे. यासोबतच गांडूळखत प्रकल्प, दाळ मिल, शेळीपालन हे शेतीपूरक व्यवसाय सुरू केलेले आहेत.

....

निंबोळी खत प्रकल्पातून वार्षिक २०० ते २५० टन खताचे उत्पादन होऊन साधारणतः ५ ते ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. माझी दोन्ही मुले अक्षय व अभय या प्रकल्पासाठी कष्ट घेत आहेत.

- संजय बनसोडे, प्रगतशील शेतकरी, बोधेगाव.

...

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांस सातत्याने फटका बसत असतो. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढविणे काळाची गरज बनली आहे.

- ज्ञानदेव घोरतळे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सेल, बोधेगाव.

....

फोटो-२५ निंबोळी खत प्रकल्प

...

ओळी - बोधेगाव येथील प्रगतशील शेतकरी संजय बनसोडे यांनी उभारलेला निंबोळी खत प्रकल्प.

Web Title: Farmers in arid areas set up neem fertilizer project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.