शेतकरी जपताहेत गावरान आंब्यांचे वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:55+5:302021-06-05T04:15:55+5:30

अकोले : ग्रामीण भागात पूर्वी चवीनुसार गावरान आंब्याची नावे मदग्या, गुळच्या, खोबऱ्या, आमट्या, चपट्या, गोधड्या, आषाढ्या, पोपटनाक्या अशी मजेशीर ...

Farmers are cultivating Gavaran mango varieties | शेतकरी जपताहेत गावरान आंब्यांचे वाण

शेतकरी जपताहेत गावरान आंब्यांचे वाण

अकोले : ग्रामीण भागात पूर्वी चवीनुसार गावरान आंब्याची नावे मदग्या, गुळच्या, खोबऱ्या, आमट्या, चपट्या, गोधड्या, आषाढ्या, पोपटनाक्या अशी मजेशीर होती. आता हे गावरान वाण संपुष्टात आले असून त्यांची जागा हापूस, केशर, पायरीने घेतली आहे. काल परत्वे दुर्मिळ होत चालले गावरान-रायवळ आंबे वाण जतन करण्यासाठीच्या जनजागृतीचा वसा पर्यावरणवादी शेतकरी रमाकांत डेरे यांनी घेतला आहे.

प्रवरा नदी काठावरील चितळवेढे येथील व आदिवासी भागातील धामणवन येथील शेतजमिनीच्या बांधांवर ४० प्रकारचे आंब्याची वृक्ष लावून रायवळ वाण जतन केले आहे. तसेच हापूस, केशर, रत्ना, पायरी, लंगडा, राजापुरी, तोतापुरी, आम्रपाली, सिंधू असे विविध कलमी आंब्याची वृक्ष देखील त्यांच्या संग्रही आहेत. गर्दणी, रेडे, आगार, इंदोरी, रूंभोडी, मेहेंदुरी परिसरात मोठ्या आमराया पूर्वी होत्या, बागायती क्षेत्र वाढल्याने आमराया नामशेष झाल्या. गावठी आंब्याची गोडी टिकून राहावी म्हणून काही शेतकरी प्रयत्नात आहेत. त्यातील एक नाव डेरे हे आहे. निसर्गामध्ये आंब्याच्या नानाविधी जाती दडलेल्या आहेत. या जातींचे संवर्धन व्हावे व त्यांचे जतन करून पुढच्या पिढीसाठी त्यांचा उपयोग व्हावा या हेतूने ते गेली चाळीसहून अधिक वर्षे झटत आहेत. त्यांनी आपल्या शेतावर तसेच शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, ग्रामपंचायत यांच्या माध्यमाने निसर्गातील अमूल्य अशा आंब्याच्या वाणांचा संग्रह करून जतन करणे यावर भर दिला आहे. आंब्याचे वानांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते प्रत्येक वर्षी तालुक्यातील विविध शाळा, संस्था, महाविद्यालय, ग्रामपंचायत, शेतकरी समूह, आदिवासी महिला शेतकरी समूह इत्यादी ठिकाणी भेटी देऊन तांत्रिक प्रशिक्षण देत मार्गदर्शन करतात. आंब्याच्या झाडाचे महत्त्व पटवून देतात व स्वतःच्या घराजवळ आंब्याच्या कोया उगवून ही रोपे लागवडीसाठी देत असतात. त्यांनी विकसित केलेल्या जल आणि मृदसंधारण पद्धतीने पावसाच्या पाण्यावर आंब्याची झाडे उगवली व वाढवली जातात. त्यांच्या अनुभवानुसार गेल्या चाळीस वर्षात हजारो आंब्याची झाडे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर व शाळा परिसरात तयार केलेले आहेत. बांंधांवर पुन्हा आमराया बहरू लागल्या आहेत.

..............

पर्यावरणवादी शेतकरी रमाकांत डेरे यांनी जतन केलेल्या गावठी रायवळ आंब्यांच्या प्रजाती पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाच्या आहे. मातृवृक्ष म्हणून त्यांचे जतन होणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. रायवळ आंब्याचा स्वामित्व अधिकार शेतकरी मिळवू शकतात.

- जितीन साठे, गावरान बियाणे संवर्धन तज्ज्ञ

........फोटो आहे --डेरे

Web Title: Farmers are cultivating Gavaran mango varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.