तुटपुंजा मदतीचा निषेध करुन शेतक-याने राज्यपालांना पाठविला आठ हजाराचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:19 IST2019-11-22T12:18:23+5:302019-11-22T12:19:36+5:30
मुंगी (ता. शेवगाव) येथील रवि रावसाहेब देशमुख या तरुण शेतक-याने आपल्या खात्यावर मदत मिळण्याआधीच एक हेक्टर क्षेत्राचा आठ हजार रूपयांचा धनादेश राज्यपालांना पाठविला आहे.

तुटपुंजा मदतीचा निषेध करुन शेतक-याने राज्यपालांना पाठविला आठ हजाराचा धनादेश
बोधेगाव : अवकाळी पावसाने खरीप पिकांसह फळे, भाजीपाला आदी लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. भरपाईपोटी राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या खरीप पिकांसाठी जाहीर केलेली ही मदत अतिशय तोकडी आहे. त्यातून मशागतीचा खर्चही निघणार नाही. या निर्णयाचा निषेध करत शेतक-यांना हेक्टरी एक लाख रूपयांपर्यंतची भरीव मदतवाढ द्यावी, अशी मागणी करत मुंगी (ता. शेवगाव) येथील रवि रावसाहेब देशमुख या तरुण शेतक-याने आपल्या खात्यावर मदत मिळण्याआधीच एक हेक्टर क्षेत्राचा आठ हजार रूपयांचा धनादेश राज्यपालांना पाठविला आहे.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील पोस्ट कार्यालयामार्फत स्पीड पोस्टने त्यांनी राज्यपालांना हा धनादेश पाठविला आहे. मागील महिन्यात राज्यात सर्वत्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. शेतक-यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रशासनाने आपला नुकसानीचा अहवाल शासनाकडे दिला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रशासकीय आढावा घेत खरीप पिकांसाठी सरसकट हेक्टरी ८ हजार रुपए तर फळबागांसाठी १८ हजार रुपए मदत जाहीर केली. राज्यपालांनी घोषित केल्याप्रमाणे गुंठ्याला अवघ्या ८० रूपयांची मदत अत्यंत तोकडी आहे.
शेतकºयांना हेक्टरी एक लाख रुपए नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत मुंगी (मूळ गाव उमापूर, ता. गेवराई, जि.बीड) येथील रवि देशमुख या तरुण शेतक-याने ८ हजार रूपयांचा धनादेश बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत राज्यपालांना पाठविला आहे. देशमुख यांना साडेसात एकर शेती असून आजोबांच्या नावे मुंगी येथे साडेतीन एकर शेतजमीन आहे.
धनादेशासोबतच त्याने राज्यपालांना एक पत्रही लिहिले आहे. त्या पत्रानुसार शेतक-यांचे सरसकट कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीप पिकांचा विमा तत्काळ लागू करावा, पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणारी रक्कम वार्षिक ६० हजार रुपए करावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत.